रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
गोगटे कॉलेजच्या समोरील रस्त्यावर नव्याने डेनेजवाहिन्या घालून चेंबरचे बांधकाम करण्यात आले. मात्र या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नसल्याने मातीचे ढिगारे साचले आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यावर माती पसरल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
दिवाळी सणानिमित्त घरासमोर रांगोळी घालून सजविले जाते. मात्र हिंदवाडीकडे जाणाऱया रस्त्यावर मातीचे ढिगारे आणि सर्वत्र माती पसरली आहे. पावसामुळे चिखल निर्माण होत आहे. गोगटे कॉलेज समोरून हिंदवाडीकडे जाणाऱया रस्त्यावर डेनेज वाहिन्या घातल्या आहेत. तसेच या ठिकाणी डेनेज चेंबरचे बांधकाम करण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर मातीचे ढिगारे हटवून रस्ता करणे आवश्यक होते. पण याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना याचा त्रास होत आहे. रस्त्याच्या दुरूस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील रहिवासी आणि वाहनधारकांतून होत आहे.