महिन्याभरात दोन्ही शहरादरम्यान एक्प्रेस धावणार असल्याची माहिती उपलब्ध
प्रतिनिधी /बेळगाव
मागील अनेक दिवसांपासून मागणी होत असलेली बेळगाव-पुणे इंटरसिटी एक्प्रेस सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या महिन्याभरात या दोन्ही शहरादरम्यान एक्प्रेस धावेल, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अवघ्या सात ते साडेसात तासांमध्ये बेळगाव ते पुणे असा प्रवास करणे शक्य होणार आहे.
माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी बेळगाव-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसची घोषणा केली होती. त्यानंतर काही तांत्रिक कारणाने एक्प्रेस सुरू करण्यास विलंब होत होता. बेळगाव रेल्वेस्थानकावर पीटलाईन व मेंटेनन्स विभाग नसल्याने एक्प्रेस सुरू होत नव्हती. त्या दरम्यान सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे एक्प्रेस सुरू होण्यासाठी विलंब झाला.
आता बेळगाव रेल्वेस्थानकावर रेल्वेमध्ये पाणी भरण्यासाठी पीटलाईन व मेंटेनन्ससाठी शेड उभारण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच बेळगाव-पुणे दरम्यान इंटरसिटी एक्प्रेस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या हुबळी ते बेंगळूर या दोन शहरादरम्यान इंटरसिटी एक्प्रेस धावत आहे. याच धर्तीवर एक्प्रेस सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बेळगावहून पुणे व पुण्याहून बेळगाव असा प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे या रेल्वेसेवेचा नक्कीच उपयोग होणार आहे.
इंटरसिटी एक्प्रेसला लोकप्रतिनिधींचा दुजोरा
मंगळवार दि. 17 रोजी बेळगाव-सिकंदराबाद एक्प्रेसचा शुभारंभ झाला. या दरम्यान माध्यमांशी बोलताना खासदार मंगला अंगडी व आमदार अनिल बेनके यांनी बेळगाव-पुणे इंटरसिटी एक्प्रेस लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे अवघ्या सात ते साडेसात तासांमध्ये बेळगावहून पुण्याला पोहोचणे सहज शक्य होईल.
प्रवाशांना सोयीस्कर वेळापत्रक हवे
रात्री बेळगावहून पुण्याला जाण्यासाठी रेल्वे सेवा उपलब्ध नाही. यामुळे 700 ते 1000 रुपये खर्च करून प्रवासी खासगी बसने पुणे गाठतात. त्यामुळे रात्री 10 ते 11 यादरम्यान बेळगावमधून निघून पहाटे 6 च्या सुमारास पुण्याला पोहोचेल अशा पद्धतीने इंटरसिटीचे वेळापत्रक केल्यास प्रवाशांनाही त्याचा फायदा होणार आहे. रात्रीच्या वेळी इंटरसिटी एक्प्रेस सुरू करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.