प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बेळगाव शहर शाखेतर्फे पथसंचलन व सार्वजनिक समारंभ झाला. प्रारंभी प्रार्थना झाल्यानंतर शहरात पथसंचलन झाले. या संचलनाला सरदार्स मैदानापासून सुरुवात झाली. पुढे काकतीवेस रोड, शनिवार खूट, गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, धर्मवीर संभाजी चौक, गोंधळी गल्ली, कॉलेज रोडमार्गे लिंगराज महाविद्यालयाच्या मैदानात सांगता झाली. यावेळी सेवक सदंड संपूर्ण गणवेशात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
संचलनानंतर लिंगराज कॉलेजच्या मैदानात शारीरिक कवायती झाल्या. यामध्ये स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. याबरोबरच योग, व्यायाम आणि घोष प्रदर्शन झाले. तसेच बँड पथकानेही उत्कृष्ट सादरीकरण करून आकर्षण वाढविले. यावेळी संघाचे द्वितीय सरसंघचालक माधवराव गोलवलकर यांच्या ‘राष्ट्रपुरुष गुरुजी’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बी. जी. धारवाड तर वक्ते म्हणून सु. रामण्णा उपस्थित होते. यावेळी कर्नाटक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्ये÷ प्रचारक सु. रामण्णा यांनी विचार व्यक्त केले. हिंदूंची जगातील सर्वात मोठी संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वांना सुपरिचित आहे. सर्व जाती-धर्माच्या व्यक्ती आज संघात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन शांततेत व उत्साहात पार पडले. याप्रसंगी शेकडो सेवक सदंड उपस्थित होते.