पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड
प्रतिनिधी/ कराड
बेळगाव-निपाणी-कारवार महाराष्ट्रात आलेचं पाहिजे, संयुक्त महाराष्ट्र झालाचं पाहिजे, कोण म्हणतयं देतं न्हायं… घेतल्याशिवायं राहतं न्हायं, कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करत मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कराडमधील शिवतीर्थावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याविरोधात आंदोलन केले. यावेळी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतले.
येथील दत्त चौकामध्ये बुधवार 7 रोजी मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शिवतीर्थावरील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर एकत्र येत महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर सुरू झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक पवित्र घेत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात आंदोलन केले. तसेच तीव्र घोषणाबाजी केली. परंतु, जिह्यात जमावबंदी असताना आंदोलनासाठी कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केल्याने पोलिसांनी मराठा महासंघाचे अनिल बापू घराळ यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, मंगळवार 6 रोजी कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीवर महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती. याचे महाराष्ट्रातही तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यानुसार कराडमध्येही मंगळवारी रात्री काही अज्ञातांनी कर्नाटकच्या विजापूर-सातारा बसवर दगडफेक केली होती. याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. त्यानंतर आज बुधवारी सकाळी मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शिवतीर्थावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात आंदोलन करत तीव्र घोषणाबाजी केली. त्यांनतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही, याबाबत काळजी घेण्याची कबुली दिल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.