Tarun Bharat

आयुष्यावर प्रभाव टाकणारे चित्रपट

Advertisements

चित्रपट फक्त गोष्टी सांगत नाहीत. काही चित्रपट असेही असतात जे प्रेक्षकांच्या मनामध्ये एक नवीन आशेचे किरण निर्माण करतात. त्यातील नायक किंवा नायिकेचा प्रेरणादायी यशाचा प्रवास बघितला की सामान्य माणसामध्येदेखील क्रांती घडवून आणण्याची इच्छा निर्माण होते. मोठय़ा पडद्यावर आपल्यासारख्याच एखाद्या व्यक्तीला यशस्वी होताना बघणे, त्याला सोबत म्हणून ऊर्जावान गाण्यांचा आस्वाद घेणे हा सगळा एक वेगळाच अनुभव आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असा कोणता ना कोणता चित्रपट किंवा भूमिका नक्की असेल जी बघून आपण आपल्या स्वप्नांकडे गवसणी घ्यायचे स्वप्न बघू लागतो.

या स्वप्नांना जर तारुण्याची साथ मिळाली तर त्यासारखी सुंदर गोष्ट नाही. तारुण्य हे असे वय आहे जे जितके अल्लड आहे तितकेच अनंत क्रांतिकारक शक्मयतांनी भरलेले आहे. त्यामुळे तारुण्यात पाहिलेले असे काही प्रेरणादायी चित्रपट मनामध्ये एक वेगळेच घर करून जातात. तारुण्याची एक खास गोष्ट म्हणजे या काळात माणसाकडे स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी अपरंपार ऊर्जा, आकांक्षा आणि ताकद असते ज्याचा योग्य वापर जर त्याने केला तर तो मोठे यश संपादन करू शकतो. पण तीच ऊर्जा आणि ताकद जर चुकीच्या कामामध्ये लावली तर त्याचा अख्या आयुष्याचा सर्वनाशदेखील होऊ शकतो. अशावेळेला तरुणांनी आपल्या आजूबाजूचे वातावरण सकारात्मक ठेवले पाहिजे. योग्य गुरु आणि आदर्श निवडून, योग्य साहित्याचा अभ्यास केला पाहिजे. खालील भारतीय चित्रपट प्रत्येक तरुण तरुणीने आवर्जून बघावेत कारण तारुण्याच्या ऊर्जेला या सामान्य माणसांच्या असामान्य गोष्टी एक नवीन क्रांतिकारक दृष्टिकोन देऊ शकतात.

1. उडान (2010)

कोणत्याही मुलासाठी त्याचे आईवडील म्हणजे त्याचे पहिले आदर्श असतात. मुलाला मिळालेल्या पालकत्वाच्या गुणवत्तेचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा परिणाम होतो. उडान हा वडील मुलाच्या नात्यावरचा एक सामाजिक चित्रपट आहे. रोहनला बोर्डिंग स्कूलमधून काढून टाकण्यात येते आणि 8 वर्षांपासून रोहनच्या आयुष्यात गैरहजर असलेल्या वडिलांकडे परत जाण्यास भाग पाडले जाते. रोहनच्या वडिलांची भूमिका रोनित रॉय साकारत आहे, जे शिस्तप्रिय, भावनिकदृष्टय़ा बोथट प्रकारचे गृहस्थ आहेत. ते रोहनच्या स्वप्नांचा आदर करत नसतात आणि त्याला अभियंता बनण्यास भाग पडतात. अशावेळेला सगळय़ा अडथळय़ांना पार करून रोहन स्वतःचे अस्तित्व कसे सिद्ध करतो हे आवर्जून बघण्यासारखे आहे.

2. वेक अप सीड (2009)

हा चित्रपट बघितला की ‘आराम हराम आहे’ या चित्रपटातील जगदीश खेबूडकर लिखित, सुधीर फडक्मयांनी गायिलेले ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ हे गीत आठवते. त्या गाण्यातील ‘तुज भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेडय़ा घेशी आसरा’ या शब्दरचना या चित्रपटातील सिद्धार्थ मेहराच्या (रणबीर कपूर) प्रवासाला समर्पक ठरतात. श्रीमंत घरात वाढलेला, पैशाची, कष्टाची किंमत नसलेला सीड जेव्हा वडिलांशी भांडण करून घरा बाहेर पडतो आणि कष्टाने पैसे कमवायला लागतो, तेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी केलेले त्याग त्याला समजतात. बऱयाचदा मोठमोठय़ा यशाच्या मागे धावताना या छोटय़ा छोटय़ा गोष्टींची किंमत आपण ठेवत नाही. हा चित्रपट खरोखर तारुण्याला एक नवा दृष्टिकोन देतो.

3. गुरु (2007)

गुजरातच्या एका छोटय़ा गावातून आलेला माणूस, त्याच्या मेहनतीने, बुद्धीने आणि चिकाटीने भारतातील सगळय़ात मोठय़ा उद्योगपतींपैकी एक कसा होतो त्याची ही गोष्ट आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या प्रभावी अभिनयाला ए आर रहमानच्या सुंदर संगीताची साथ मिळाल्यामुळे, हा फक्त एक प्रेरक चित्रपट नसून, एक पुरेपूर मनोरंजक आणि सकारात्मक अनुभव आहे. कित्येक तरुण आज स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न बघतात. पण खूप कमी लोकांचे हे स्वप्न पूर्ण होते. यशस्वी उद्योजक होण्यासाठी कोणता दृष्टिकोन ठेवला पाहिजे हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर हा चित्रपट नक्की बघा.

4. स्वदेस (2004)

यात शाहरुखखानने मोहन भार्गवची भूमिका साकारली आहे, जो नासामध्ये काम करणारा अनिवासी भारतीय आहे. काही वर्षांनी जेव्हा तो भारतातील आपल्या गावात परततो तेथील गंभीर वस्तुस्थिती त्याला समजते. ही जातीयवाद, राजकारण, देशभक्ती आणि क्रांतिबद्दलची कहाणी आहे. देशप्रेमाची आणि देशभक्तीची अद्वितीय कहाणी हा चित्रपट आपल्यासमोर मांडतो. देशातील तरुण हे त्याचे भविष्य असतात. त्यामुळे देशाप्रती आपली जबाबदारी समजून आपल्या जन्मभूमीच्या उद्धाराची जबाबदारी घ्यायला हा चित्रपट नक्की प्रेरित करतो.

5. ह्रिदयम ( 2022 मल्याळी)

कॉलेजचे दिवस कोणाला आवडत नाहीत? आयुष्यातील या नवीन पर्वामध्ये सगळेच रोमांचक वाटत असते. नवीन जागा, नवीन मित्र, नवीन अनुभव आणि नवीन भावना. कॉलेजमध्ये झालेले पाहिले प्रेम माणूस कधीच विसरू शकत नाही.  स्वतःच्या खऱया व्यक्तिमत्त्वाच्या शोधाची आणि त्यामध्ये भावना आणि हार्मोन्सशी झुंज देणारी ही गोष्ट आहे. बरेचदा माणूस अल्लड प्रेमामध्ये चुकीचे पाऊलदेखील उचलतो ज्याचा नकारात्मक प्रभाव त्याच्या भावी आयुष्यावर पडतो. हा चित्रपट बघितल्यावर तुमच्या कॉलेजमधल्या आठवणी, तुमचे पाहिले प्रेम, त्यामुळे झालेला त्रास, मित्रांबरोबर केलेली मज्जा आणि या सगळय़ामध्ये नकळत मोठे झालेलो आपण, या सगळय़ाची तुम्हाला नव्याने आठवण येईल. त्याचबरोबर तरुण मंडळींसाठी हा एक हलका फुलका चित्रपट आहे कारण त्यांना त्यांच्या वर्तमान आयुष्यामध्ये आणि या चित्रपटातील प्रसंगांमध्ये बरेच साधर्म्य जाणवेल.

असे अनेक चित्रपट विविध भाषांमध्ये आणि देशांमध्ये बनत आले आहेत. त्याचबरोबर असेही चित्रपट आहेत जे विध्वंसक आणि हिंसक गोष्टी सांगतात. तारुण्याचा काळ जितका सुंदर आहे तितकाच महत्त्वपूर्णदेखील आहे. योग्य साहित्य वाचले, पहिले तर त्याचा सकारात्मक परिणाम मेंदूवर होईल आणि आयुष्यामध्ये एक आशावादी दृष्टिकोन तयार होईल.

  -श्राव्या माधव कुलकर्णी

Related Stories

लॉकडाऊनला रामराम

Patil_p

लग्नाला जातो मी…

Patil_p

राज्यपाल बदलले, मुख्यमंत्रीही बदलणार का?

Amit Kulkarni

क्षमा करणें तुम्हांसि उचित

Patil_p

सत्ताछायेचा वारसा…!

Patil_p

कायद्याचा ‘फास’

Patil_p
error: Content is protected !!