ऑनलाईन टीम/तरुण भारत
खासदार संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chhatrapati) यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ आज संपत आहे. संभाजीराजे पुढे काय करणार हे लवकरच जाहीर करणार आहेत. ६ मे रोजी शाहू स्मृती शताब्दीचा कार्यक्रम आहे. त्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं. “पुढे काय करायचं हे माझ्या डोक्यात ठरलेलं आहे, फक्त ते जाहीर नंतर करणार,” असं त्यांनी सांगितलं. (MP Sambhaji Raje Chhatrapati’s Rajya Sabha term ends today)
राजकारणात उतरायचं हे निश्चित
संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ आज समाप्त होत आहे. आज पत्रकारांनी दिल्लीचे राजकारण करणार की महाराष्ट्राचे राजकारण या प्रश्नावर संभाजीराजे म्हणाले की, “दोन्ही मला आवडतं. राजकारणात आता उतरायचंय हे आता निश्चित आहे. मग दिल्ली असो किंवा महाराष्ट्र असो, दोन्हीत मी रमतो. दोन्हीकडे माझे संपर्क वाढलेले आहेत. महाराष्ट्र माझ्याकडे बघतो की शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांचे विचार घेऊन दिल्लीत जायला पाहिजे. तर दिल्लीतल्या लोकांची इच्छा आहे शिवाजी महाराज, शाहूंचा वंशज इथे आला आहे, इथे त्याची ताकद वाढायला हवीय. दोन्ही अँगल आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन्हीच्या माध्यमातून मी राजकारणात सक्रिय होणार आहे.”