पिंपरी : शिवसेनेत बंडखोरी करुन भाजपसोबत सरकार स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे दाखल झाले आहेत. शिंदे गटात गेल्याने खासदार बारणे यांच्या थेरगावातील निवासस्थान आणि संपर्क कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान, शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेही शिंदे गटात गेले आहेत. आढळराव यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या भोसरीचे 10 वर्षे संसदेत प्रतिनिधीत्व केले आहे. आजी-माजी खासदार शिंदे गटात गेल्याने पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
पिंपरी-चिंचवड, मावळ आणि पनवेल, उरण, खालापूर या भागाचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. खासदार बारणे हे सलग दोनवेळा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात खासदार बारणे यांची ताकद आहे. त्यांचे पुतणे नगरसेवक राहिलेत. त्यांचे पुत्र विश्वजीत बारणे पिंपरी-चिंचवड शहर युवासेना प्रमुख आहेत. पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, आकुर्डीतील माजी नगरसेवक प्रमोद कुटे, वाकड भागातील माजी नगरसेविका रेखा दर्शिले, महिला संघटिका उर्मिला काळभोर, माजी शहरप्रमुख योगेश बाबर हे खासदार बारणे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे बारणे शिंदे गटात गेल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
आम्ही शिवसेनेशी संलग्न
शिवसेना गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेवाळे यांच्या नियुक्तीला मी पाठिंबा दिला आहे. संसदीय कामामध्ये राहुल शेवाळे यांची जास्त सहकार्याची भूमिका राहिली आहे. त्यामुळे मी त्यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही सगळे शिवसेनेशी संलग्न आहोत, असेही बारणे म्हणाले.
हेही वाचा : लोणावळ्यात दोन वर्षाच्या बालकाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू