खासदार उदयनराजे यांची प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निधा केला मंजूर : दिल्लीत खासदार उदयनराजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट
प्रतिनिधी/सातारा
साताऱ्यातील पोवईनाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळयाच्या नुतनीकरणासाठी सातारा नगरपरिषदेने राज्य शासनास सादर केलेल्या 16 कोटी 14 लाख रुपयांच्या प्रस्तावास आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मंजूरी दिली. सातारकरांकरीता खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या सूचनेनुसार या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेवून निधी सुध्दा नगरपरिषदेला प्रदान केला जाईल, अशी ग्वाही याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अशी माहीती खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे दिली.
राज्याच्या विविध कामांकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी दि. 19 रोजी दिल्ली येथे आले होते, त्या दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. भेटी दरम्यान विविध विषयावर चर्चा करण्यात आली. सातारा पोवईनाका येथील शिवप्रभुंच्या स्मारकाच्या नुतनीकरणाविषयी आजपर्यंत झालेल्या कामांची माहीती यावेळी मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच सातारा नगरपरिषदेने या परिसराच्या विकासाचा सुमारे 16 कोटी 14 लाख रुपयांच्या प्रस्ताव राज्यशासनाकडे सादर केला आहे. त्यास राज्यसरकारकडून सातारा नगरपरिषदेला निधी वितरीत करण्यात यावा अशी विनंती केली. शिवप्रभुंच्या पूर्णाकृती स्मारकाच्या प्रेरणादायी कार्यासाठी, खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या सूचनेचा आम्ही नितांत आदर करतो, याकामासाठी आजच मी तत्वतः मान्यता देत आहे. नगरपरिषदेच्या प्रस्तावानुसार, राज्य सरकारकडून जरुर ती कार्यवाही करुन तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी माझी राहील, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
तसेच आगामी कालावधीत सातारा शहरातील पोवई नाका परिसराचा समयोचित सुयोग्य विकास साध्य होणार आहे. सातारकरांना अभिमान वाटेल व प्रेरणा मिळेल अश्या मोठय़ा विकासकामाची सुरुवात देखील लवकरच होईल, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमूद केले आहे.