पुणे / प्रतिनिधी :
राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा उद्या (दि. 30) राज्यभरातील हजारो परीक्षा केंद्रांवर होणार आहे. या परीक्षेची प्रवेशपत्रे समाजमाध्यमावर लीक झाल्याचे प्रकरण नुकतेच उघड झाले होते. त्यामुळे परीक्षेत कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी एमपीएससीकडून पुरेशी तयारी करण्यात आली आहे.
8 विविध संवर्गातील एकूण 8 हजार 169 पदांच्या भरतीसाठी अराजपत्रित गट – ब व गट – क सेवा पूर्व परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून 4 लाख 66 हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेची प्रवेशपत्रे लीक झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. एमपीएससीने विद्यार्थ्यांची माहिती सुरक्षित असून, परीक्षा ठरलेल्या दिवशीच होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज परीक्षा होत आहे.
परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना एमपीएससीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेल्या प्रवेशपत्राची प्रत सोबत आणणे अनिवार्य असेल. परीक्षेसाठी दीड तास अगोदर केंद्रावर हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कुठलेही एक मूळ ओळखपत्र सोबत आणावे, अशा सूचना एमपीएससीकडून करण्यात आल्या आहेत.