पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती : बालकीर्तनकार चैतन्य महाराज यांचे आज कीर्तन
वार्ताहर /किणये
भारतनगर, गणेश चौक, मुचंडी येथील गणेश मंदिराच्या कळसारोहण सोहळ्याला उत्साहात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. रविवारी गावात कळस मिरवणूक काढण्यात आली तर सोमवारी मुक्तीमठ येथील शिवसिद्ध सोमेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते कळस पूजन करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवारी सकाळी सिद्धेश्वर मंदिर येथून कळस मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत महिला व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीत टाळ मृदंग व पारंपरिक वाद्यांचा गजर झाला. सायंकाळी बसवेश्वर भजनी मंडळ मास्तमरडी यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. कणकला येथील गोंधळी मंडळाचा गोंधळाचा कार्यक्रम झाला.
सोमवारी मुक्तीमठ येथील तपोरत्न शिवसिद्ध सोमेश्वर स्वामीजी यांच्या उपस्थितीत कळसारोहण करण्यात आले. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी वाटंगी येथील माउली सोंगी भारुडी भजनाचा कार्यक्रम झाला.
मंगळवार दि. 27 रोजी सकाळी सात वाजता नित्य पूजा व महाआरती करण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता निलजी येथील महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, सायंकाळी सात वाजता गजानन महाराज यांचे प्रवचन, रात्री नऊ वाजता आळंदी येथील बालकीर्तनकार हभप चैतन्य महाराज राऊत यांचे कीर्तन निरुपण होणार आहे. आज मंगळवारी बाल कीर्तनकाराचे कीर्तन होणार आहे.
बुधवार दि. 28 रोजी सकाळी 7 वाजता नित्यपूजा, सायंकाळी 6 वाजता गावातील आजी व माजी सैनिकांचा सत्कार, त्यानंतर सायंकाळी 7 वाजता बेनकनहळळी येथील राजे शंभू स्पोर्ट्स क्लब यांचा मलखांबचा कार्यक्रम होणार आहे.
या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे गणेश मंदिर सेवा कमिटी, समाज सुधारणा युवक मंडळ, मुचंडी यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.