महापालिका प्रशासनाचे नियोजन बारगळले : रस्ता दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
ऐन पावसाच्या तोंडावर शहरातील विविध परिसरात डेनेजवाहिन्या घालण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे डेनेजवाहिन्या घालण्यात आलेल्या परिसरातील रस्ते चिखलाने माखले आहेत. शिवबसवनगर सेक्टर क्रमांक 3 येथील रस्त्याची दुर्दशा झाली असून वाहनधारकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. येथील रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
पावसाळय़ापूर्वी विकासकामे राबवून रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक होते. मात्र याबाबत महापालिका प्रशासनाचे नियोजन पूर्णपणे बारगळले असून पावसाळय़ात किंवा पावसाच्या तोंडावर विकासकामे राबविण्यात येत आहेत. परिणामी महापालिकेच्या अयोग्य नियोजनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. काही ठिकाणी चरी खोदल्यानंतर तातडीने दुरुस्ती करण्यात आली नाही. विशेषतः महाद्वार रोड, भांदूर गल्ली, चव्हाट गल्ली ढोरवाडा तसेच शिवबसवनगर परिसरात डेनेजवाहिन्या घालण्याचे काम करण्यात आले आहे. पण येथील रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही. त्यामुळे जून महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यावर चिखल निर्माण झाला आहे.
कंत्राटदारांसह प्रशासनाचे दुर्लक्ष
पावसाळय़ापूर्वी चरी बुजवून रस्ते व्यवस्थित केले असते तर रस्त्यांची अशी अवस्था झाली नसती. पण कंत्राटदारांसह प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. ठिकठिकाणी वाहने अडकून राहत आहेत. शिवबसवनगर सेक्टर क्रमांक 3 येथील रस्त्यावर चिखल निर्माण झाला आहे. यामध्ये दुचाकी वाहनधारक घसरून पडत आहेत. त्यामुळे अपघात होत असल्याने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.