प्रतिनिधी / हलगा : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानला जाणारा हलगा गावातील मोहरम सण मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त गावात दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यामध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला होता. सोमवारपासून हलगा गावातील पवित्र मोहरमला सुरुवात झाली. गावापासून अर्धा कि. मी. अंतरावर दर्गा आहे. यामध्ये सोमवारी सकाळी भाविकांनी प्रसादासाठी मालेदा दिला. सायंकाळी मजनू खेळत गावातील पाच-सहा बैलगाड्या सजवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रत्येकाच्या घरातून एक-दोन लाकडे जमा करण्यात आली. सोमवारी दर्ग्याजवळ विधिवत पूजा करून आणलेली लाकडे इंगळ्यांसाठी वापरण्यात आली.
गावच्या मोहरमच्या माध्यमातून मुस्लीम बांधवांमध्ये एकात्मतेचे दर्शन घडले. मंगळवारी सकाळी सर्व जाती-धर्माच्या लोकांनी इंगळ्यांमधून पळून आपला नवस, व्रत केला. मंगळवारी सकाळपासून गावात देव मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मजनू खेळ रंगला होता. तरुण व बालचमू हातात पट्टा घेऊन पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य करीत होते.