शाहरुख आणि बेकहॅम होणार शेजारी
मुंबई / वृत्तसंस्था
भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी दुबईत समुद्रकिनारी आलिशान बंगला खरेदी करण्यासाठी करार केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी हे दुबईतील बीच साईड व्हिलाचे खरेदीदार आहेत. या व्हिलाची किंमत 80 मिलियन डॉलर (6,396,744,880 रुपये) असल्याचे सांगितले जात आहे. अंबानी हे शहरातील सर्वात मोठे निवासी मालमत्ता खरेदीदार आहेत. दुबईतील पाम जुमेरा बीचवरील ही प्रॉपर्टी या वर्षाच्या सुरुवातीला मुकेश अंबानी यांनी आपला धाकटा पुत्र अनंत अंबानी याच्यासाठी खरेदी केली आहे. तथापि, अंबानींचे मुख्य निवासस्थान मुंबईतील 27 मजली गगनचुंबी इमारत ‘अँटिलिया’मध्येच राहणार आहे.
अंबानी कुटुंबीयांची दुबईतील नवी मालमत्ता ब्रिटिश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील बादशाह शाहरुख खान यांच्या निवासानजीक असल्याने अंबानी आता त्यांचे शेजारी बनणार आहेत. अंबानींच्या या नवीन व्हिलामध्ये एक बेडरूम, एक पर्सनल स्पा आणि इनडोअर आणि आउटडोअर ब्रिज आहेत. आतापर्यंत दुबईतील प्रॉपर्टी व्यवहार गुप्त ठेवण्यात आला होता. हे घर खरेदी करण्यासाठी अंबानी यांनी लाखो डॉलर्स खर्च केले आहेत. दुबई शहर अतिश्रीमंत लोकांसाठी एक आवडते ठिकाण म्हणून उदयास येत आहे. तेथील सरकारने दीर्घकालीन गोल्डन व्हिसा लागू करून परदेशी लोकांना घर खरेदीची प्रक्रिया सुकर केली आहे.