गाझीपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाचा निर्णय
वृत्तसंस्था/ गाझीपूर
उत्तरप्रदेशच्या मऊचे माजी आमदार आणि माफिया मुख्तार अंसारी यांना गुरुवारी न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. गाझीपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाने माजी आमदाराला ही शिक्षा ठोठावली आहे. गँगस्टर कायद्याच्या अंतर्गत मुख्तार अंसारी आणि भीम सिंह यांना दोषी ठरविण्यात आले आहे.
पूर्वांचलचा माफिया असलेल्या मुख्तार अंसारीविरोधात 1996 मध्ये नोंद गुन्हय़ाप्रकरणी न्यायालयाने गुरुवारी निर्णय दिला आहे. यावेळी अंसारी हे न्यायालयात उपस्थित नव्हते. मुख्तार अंसारी ईडीच्या कोठडीत असल्याने आणि सुरक्षेच्या कारणास्तव अंसारीला गाझीपूर न्यायालयात आणले गेले नव्हते. प्रयागराज येथील ईडी कार्यालयात यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करण्यात आली होती.
1996 मध्ये मुख्तार अंसारी विरोधात गँगस्टर कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नेंदविण्यात आला होता. 5 खटल्यांच्या आधारारव मुख्तार विरोधात कारवाई करण्यात आली होती. काँग्रेस नेते अजय राय यांचे ज्येष्ठ बंधू अवधेश राय हत्या प्रकरण आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात सामील असल्याचा आरोप मुख्तार विरोधात होता. मुख्तार अंसारीने खटल्याचा निर्णय लागेपर्यंत चौकशी न करण्याची विनंती ईडी अधिकाऱयांकडे केली होती.