1 ऑक्टोबरपासून स्वीकारणार पदभार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांना भारताचे नवे ऍटर्नी जनरल म्हणून नियुक्त केले जाणार आहे. 1 ऑक्टोबरपासून ते या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. यापूर्वी 19 जून 2014 रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देशाचे ऍटर्नी जनरल म्हणून नियुक्त केले होते. 18 जून 2017 पर्यंत रोहतगी देशाचे 14 वे ऍटर्नी जनरल म्हणून कार्यरत होते. रोहतगी हे देशातील प्रख्यात वकील मानले जातात.
विद्यमान ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे. तसेच त्यांनी स्वतःचा कार्यकाळ आणखी वाढवू नये अशी सूचना केली आहे. 91 वर्षीय वेणुगोपाल हे 30 जून 2017 रोजी देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी झाले होते. वेणुगोपाल यांचा कार्यकाळ अनेकदा वाढविण्यात आला आहे. 29 जून रोजी वेणुगोपाल यांना आणखी 3 महिन्यांसाठी पुन्हा ऍटर्नी जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. 30 सप्टेंबरनंतर हे पद आपण सांभाळणार नसल्याचे संकेत वेणुगोपाल यांनी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात दिले होते.
वेणुगोपाल यांच्यानंतर ऍटर्नी जनरल पद स्वीकारण्यास रोहतगी यांनी सहमती दर्शविली आहे. यापूर्वी 2014 मध्ये त्यांना 3 वर्षांसाठी ऍटर्नी जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ऍटर्नी जनरलचा कार्यकाळ सर्वसाधारणपणे तीन वर्षांचा होता. वेणुगोपाल यांचा या पदावरील पहिला कार्यकाळ 2020 मध्ये समाप्त होणार होता, त्यावेळी त्यांनी वाढत्या वयाचे कारण देत स्वतःला जबाबदारीपासून मुक्त करण्याची विनंती सरकारकडे केली होती. परंतु त्यानंतर त्यांनी एक वर्षाचा नवा कार्यकाळ स्वीकारला होता.