मूळ गाव सैफाई येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार ः पुत्र अखिलेश यांनी दिला मुखाग्नी
सैफाई / वृत्तसंस्था
ज्येष्ठ समाजवादी आणि लोहियावादी नेते तसेच समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांच्या पार्थिवावर उत्तर प्रदेशातील त्यांचे मूळ गाव सैफाई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी त्यांचे वृद्धापकालीन आजाराने निधन झाले होते. त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी त्यांच्या हजारो समर्थकांची आणि सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. ‘मुलायमसिंग अमर रहे’ अशा घोषणांमध्ये साश्रू नयनांना त्यांना शासकीय सन्मानात अखेरचा निरोप देण्यात आला.
अग्नीसंस्कार स्थळी उत्तर प्रदेशच्या विविध भागांमधून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. वातावरण ढगाळ होते आणि अधूनमधून पावसाच्या सरीही येत होत्या. मात्र, याचा त्यांच्या समर्थकांवर कोणताही परिणाम झाला नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षणमंत्री राजनाथसिंग, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि मुलायमसिंग यादव यांचे बंधू शिवपालसिंग यादव तसेच अन्य अनेक राजकीय नेतेही याप्रसंगी या स्थळी उपस्थित होते.
अंत्यदर्शनासाठी लोकांची रीघ
82 वर्षांचे मुलायमसिंग यादव यांचे हरियाणातील गुरुग्राम येथील एका खासगी रुग्णालयात सोमवारी निधन झाले. गेले काही महिने ते आजारी होते. सोमवारी दुपारनंतर त्यांचे पार्थिव इटावा जिल्हय़ातील त्यांचे मूळ गाव सैफाई येथे आणण्यात आले होते. पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या गावातील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. अंत्यदर्शनासाठी लोकांची दिवसभर रीघ लागली होती.
नेताजी या नावाने प्रसिद्ध
मुलायमसिंग यादव हे जुन्या पिढीतील कट्टर लोहियावादी नेते होते. त्यांचे कार्यकर्ते आणि अनुयायी त्यांना नेताजी या लाडक्या नावाने ओळखत असत. सिंग यांचा राजकीय कार्यकाळ अनेक चढउतारांनी भरलेला होता. उत्तर भारतातील राजकारणाची दिशा बदल्याचे महत्त्वाचे कार्य करणाऱया नेत्यांमधील महत्त्वाचे काँगेस विरोधी नेते म्हणून त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मात्र, उत्तरायुष्यात त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांशी तडजोड करण्याची लवचिकताही दाखविली होती.
सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती
अंत्यविधीला सर्व महत्त्वाच्या पक्षांचे नेते उपस्थित होते. काँगेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे, उत्तर प्रदेशातील काँगेस नेते प्रमोद तिवारी, अभिनेता अभिषेक बच्चन, त्यांची जया बच्चन, ज्येष्ठ समाजवादी पक्ष नेते रामगोपाल यादव, स्वामी प्रसाद मौर्य, धर्मेंद यादव, राम गोविंद चौधरी, किरण्मय नंदा, ओमप्रकाश सिंग, अझम खान इत्यादी नेते उपस्थित होते. याशिवाय अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहिले. त्यांच्यात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा समावेश होता. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेलही उपस्थित होत्या.
पंतप्रधान मोदींच्या वतीने मानवंदना
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने मुलायमसिंग यादव यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुग्राम येथील रुग्णालयात जाऊन अंत्यदर्शन घेतले आणि अखिलेश यादव यांची भेट घेऊन सांत्वन केले. मुलायमसिंग यादव हे राजकारणात अनेक दशके कार्यरत राहिले. त्यांचे राजकीय कौशल्य वाखाणण्यासारखे होते. ते नेहमीच तळागाळातील नेते म्हणून स्मरणात राहतील. त्यांच्या मृत्यूमुळे एका देदिप्यमान युगाचा अस्त झाला आहे, असा शोकसंदेश अमित शहा यांनी ट्विटरवरुन प्रसारित केला आहे.