वृत्तसंस्था/ रियाध
मुंबई सिटी एफसीने नवा इतिहास निर्माण करताना येथे झालेल्या एएफसी आशियाई चॅम्पियन्स लीगमध्ये विजय मिळविणारा पहिला भारतीय क्लब संघ होण्याचा मान मिळविला. एक गोलची पिछाडी भरून काढत मुंबई सिटी एफसीने इराकच्या बलाढय़ एअरफोर्स क्लबचा 2-1 असा पराभव केला.
गट ब मधील सामन्यात भारताने 59 व्या मिनिटाला एअरफोर्स क्लबला गोल बहाल केल्यानंतर 70 व्या मिनिटाला दिएगो मॉरिसिओच्या पेनल्टीवर भारताने बरोबरी साधली. बॉक्स क्षेत्रात त्याला पाडवल्यामुळे ही पेनल्टी मिळाली होती. त्यानंतर पाचच मिनिटांनी डिफेंडर राहुल भेकेने जाहूच्या कॉर्नरवर मिळालेल्या चेंडूला हेडरवर गोलजाळय़ाची दिशा देत मुंबईचा दुसरा व निर्णायक गोल नोंदवला. मुंबई सिटी एफसीने पहिल्या सामन्यात अल शबाबकडून 0-3 असा पराभव स्वीकारला होता. पूर्वार्ध कोरा गेल्यानंतर तीनवेळच्या एएफसी कप चॅम्पियन्स असलेल्या एअरफोर्स क्लबला हम्मादी अहमदने आघाडी मिळवून दिली. पण मॉरिसिओ व भेके यांनी मुंबईचे गोल नोंदवून आपल्या संघाला विजय मिळवून देत 3 गुण मिळवून दिले. मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपरलीगचे शील्ड आणि 2020-21 या मोसमात ट्रॉफी जिंकली आहे.
एअरफोर्स क्लबने प्रारंभापासूनच आक्रमणाला सुरुवात केली होती. मुंबईच्या हद्दीत शिरण्यात त्यांनी यश मिळविले. पण त्यांना मिळालेल्या संधीचे गोलात रूपांतर करता आले नाही. एअरफोर्सचा अला अब्बास मुंबई सिटीसमोर वारंवार अडचणी निर्माण करीत होता. नवव्या मिनिटाला त्याने एक संधी वाया घालवली. त्याने मारलेला फटका गोलरक्षक फुरबा लचेन्पाने सहजपणे थोपवला. 30 व्या मिनिटाला मुंबई सिटीने गोलच्या दिशेने पहिला फटका मारला. अहमद जाहूने चेंडू पुढे नेत लालियनझुआला छांगटेकडे चेंडू सोपवला. पण त्याने लांबवरून मारलेला फटका वाईड गेला.
एअरफोर्सलाही एक संधी मिळाली होती. अब्बासने डी. इस्माईकडून आलेल्या चेंडूला हेडरवर जोरदार फटका मारला. पण तो बारवरून बाहेर गेला. 31 व्या मिनिटाला मुंबई सिटीलाही छान संधी मिळाली होती. त्यांच्या अहमद जाहूने धोकादायक क्षेत्रातून क्रॉस पास पुरविला. पण दिएगो मॉरिसिओने मारलेला हेडर गोलच्या दिशेने जाऊ शकला नाही. 34 व्या मिनिटाला एअरफोर्सला सर्वोत्तम संधी मिळाली होती. इस्माईलने मिळवून दिलेल्या या संधीवर अगदी जवळ असूनही हुसेन जब्बारला चेंडू अचूक जाळय़ात मारता आला नाही. छांगटेने तीन मिनिटांनंतर फिंगरटिप्सने अब्बासचा आणखी एक प्रयत्न फोल ठरविला. मुंबई सिटीचा पुढील सामना गुरुवारी संयुक्त अरब अमिरातच्या अल जझिरा क्लबविरुद्ध तर एअरफोर्सचा सामना सौदी अरेबियाच्या अल शबाब एफसीविरुद्ध होणार आहे.