वृत्तसंस्था/ रियाद
एएफसी चॅम्पियन्स लिग क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेत ब गटातील येथे झालेल्या सामन्यात अल जझिरा क्लबने मुंबई सिटी एफसी संघाचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला.
या स्पर्धेतील मुंबई सिटी संघाचा गेल्या तीन सामन्यातील हा दुसरा पराभव आहे. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात अल शाबाद क्लबने मुंबई सिटीचा 3-0 असा पराभव केला होता. ब गटातील झालेल्या सामन्यात अल जझिरा संघातील अली मबखुतने 40 व्या मिनिटाला एकमेव निर्णायक गोल नोंदविला. या सामन्यात मुंबई सिटी संघाने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या. या स्पर्धेतील अल जझिरा क्लबचा हा पहिला विजय आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात अल जझिरा आणि मुंबई सिटी या दोन्ही संघांनी आता प्रत्येकी तीन गुण नोंदविले आहेत. गेल्या बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबई सिटीने इराकच्या एअर फोर्स क्लबचा 2-1 असा पराभव केला होता.