सामनावीर हिली मॅथ्यूजची अष्टपैलू कामगिरी, बेंगळूरचा 9 गड्यांनी पराभव
वृत्तसंस्था/ मुंबई
‘सामनावीर’ हिली मॅथ्यूजच्या शानदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर महिलांच्या पहिल्या प्रिमियर लिग टी-20 क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सने आपला सलग दुसरा विजय नोंदवला. या स्पर्धेतील सोमवारी येथे झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव केला.
भारतात पहिल्यांदाच होत असलेल्या महिलांच्या टी20 प्रिमियर लिग स्पर्धेत मुंबई इंडियन्सने सलामीच्या सामन्यात गुजरात जायंट्सचा 143 धावांनी दणदणीत पराभव करून आपल्या मोहिमेला प्रारंभ केला होता. आता मुंबई इंडियन्स संघाने या स्पर्धेत दोन सामन्यातून 4 गुण मिळवताना 5.185 रनरेट राखला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा डाव 18.4 षटकात 155 धावात आटोपला. त्यानंतर मुंबई इंडियन्सने 14.2 षटकात 1 बाद 159 धावा जमवत आपला विजय नोंदवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला नमविले.
मुंबई इंडियन्सच्या अचूक गोलंदाजीसमोर रॉयल चलेंजर्स बेंगळूरचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. कर्णधार स्मृती मानधना आणि सोफी डिव्हाईन यांनी सलामीच्या गड्यासाठी 4.2 षटकात 39 धावांची भागीदारी केली. मुंबईच्या सायका इशाकीने डिव्हाईनला कौरकरवी झेलबाद केले. तिने 11 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 16 धावा जमवल्या. इशाकीने आपल्याच या षटकातील चौथ्या चेंडूवर दिशा कसाटचा खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा उडविला. हिली मॅथ्यूजने कर्णधार मानधनाला वांगकडे झेल देण्यास भाग पाडले. तिने 17 चेंडूत 5 चौकारासह 23 धावा केल्या. हिली मॅथ्युजने आपल्या याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर नाईटचा खाते उघडण्यापूर्वी त्रिफळा उडवला. बेंगळूरची स्थिती यावेळी 4 बाद 43 अशी होती. इलिसी पेरी आणि रिचा घोष यांनी संघाचा डाव थोडा सावरण्याचा प्रयत्न करताना पाचव्या गड्यासाठी 28 धावांची भर घातली. पेरी एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचित झाली. तिने 7 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 13 धावा जमवल्या. कनिका अहुजा आणि रिचा घोष यांनी सहाव्या गड्यासाठी 34 धावांची भागीदारी केली. पूजा वस्त्रकरने अहुजाला झेलबाद केले. तिने 13 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 22 धावा जमवल्या. मॅथ्यूजने रिचा घोषला झेलबाद करून आपल्या संघासमोरील मोठा अडथळा दूर केला. तिने 26 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 28 धावा जमवल्या. श्रीयांका पाटील आणि मेगान स्कूट यांनी एकेरी आणि दुहेरी धावावर भर देण्याचा प्रयत्न केला. या जोडीने आठव्या गड्यासाठी 34 धावांची भर घातल्याने बेंगळूर संघाला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. नॅट स्किव्हेर ब्रंटने पाटीलला पायचित केले. तिने 15 चेंडूत 4 चौकारासह 23 धावा केल्या. अॅमिलिया केरने रेणुका सिंग ठाकुरचा 2 धावावर त्रिफळा उडवला. त्यानंतर तिने स्कूटला भाटियाकरवी यष्टिचित केले. स्कूटने 14 चेंडूत 3 चौकारासह 20 धावा जमवल्या. 18.4 षटकात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा डाव 155 धावात आटोपला. त्यांच्या डावात 4 षटकार आणि 21 चौकार नोंदवले गेले. हिली मॅथ्यूजने 28 धावात 3, इशाकीने 26 धावात 2, अॅमिलिया केरने 30 धावात 2 तर नॅट स्किव्हेर ब्रंट आणि पूजा वस्त्रकर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबई इंडियन्सच्या डावाला हिली मॅथ्यूज आणि यास्तिका भाटिया यांनी दमदार सुरुवात करून दिली. पहिल्या पाच षटकात या जोडीने 45 धावा झोडपल्या. प्रिती बोसच्या गोलंदाजीवर भाटिया पायचित झाली. तिने 19 चेंडूत 4 चौकारासह 23 धावा जमवल्या.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या गोलंदाजांना यानंतर मात्र शेवटपर्यंत यश मिळाले नाही. मॅथ्यूज आणि नॅट स्किव्हेर ब्रंट यांनी तुफान फटकेबाजी केली. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नॅट स्किव्हेर ब्रंट अधिक धावा जमवू शकली नव्हती पण सोमवारच्या सामन्यात तिने 29 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारासह नाबाद 55 धावा झोडपल्या. हिली मॅथ्यूजने 38 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारासह नाबाद 77 धावा झोडपल्या. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 9.2 षटकात अभेद्य 114 धावांची शतकी भागीदारी करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या सामन्यात हिली मॅथ्यूजने फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही प्रभावी कामगिरी केली. नॅट स्किव्हेर आणि मॅथ्यूज यांनी चौकारांची आतषबाजी केली. ब्रंटने श्रीयांका पाटीलच्या एका षटकात 3 चौकार ठोकले. मुंबई इंडियन्सच्या डावातील हे आठवे षटक होते. त्यानंतर नॅट स्किव्हेर आणि मॅथ्यूज यांनी पुन्हा आपल्या संघातील डावातील 13 व्या षटकात पाटीलच्या गोलंदाजीवर 3 चौकार आणि 1 षटकारासह एकूण 20 धावा फटकावून आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. या विजयामुळे मुंबई इंडियन्स संघाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात आपले आघाडीचे स्थान अधिक मजबूत केले आहे. या स्पर्धेतील सोमवारचा हा सहावा सामना होता.
संक्षिप्त धावफलक : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर 18.4 षटकात सर्वबाद 155 (स्मृती मानधना 23, सोफी डिव्हाईन 16, इलिसी पेरी 13, नाईट 0, रिचा घोष 28, कनिका आहुजा 22, श्रीयांका पाटील 23, मेगान स्कूट 20, रेणुकासिंग 2, प्रिती बोस नाबाद 1, कसाट 0, अवांतर 7, हिली मॅथ्यूज 3-28, इशाकी 2-26, अॅमिलिया केर 2-30, पूजा वस्त्रकर 1-8, नॅट स्किव्हेर ब्रंट 1-34), मुंबई इंडियन्स 14.2 षटकात 1 बाद 159 (हिली मॅथ्यूज नाबाद 77, यास्तिका भाटिया 23, नॅट स्किव्हेर ब्रंट नाबाद 55, अवांतर 4, प्रिती बोस 1-34).
आजचा सामना
गुजरात जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर, ब्रेबॉर्न स्टेडियमवर वेळ-सायं. 7.30 वाजता.