अंतिम लढतीत दिल्ली कॅपिटल्सवर 7 गडय़ांनी मात, नॅट सिव्हर बंटची विजयी खेळी, मॅथ्यूज-वाँगचे प्रत्येकी 3 बळी
वृत्तसंस्था/ मुंबई
महिलांच्या पहिल्या प्रिमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सने पहिले विजेते होण्याचा मान मिळविला. शेवटच्या षटकापर्यंत रोमांचक ठरलेल्या अंतिम लढतीत मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 7 गडय़ांनी पराभव केला. 55 चेंडूत नाबाद 60 धावा फटकावणारी नॅट सिव्हर ब्रंट तसेच प्रत्येकी 3 बळी मिळविणारे गोलंदाज हेली मॅथ्यूज व इसी वाँग हे त्यांच्या विजयाचे प्रमुख शिल्पकार ठरले.
मुंबईने भेदक मारा करीत दिल्ली कॅपिटल्सला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 131 धावांवर रोखले. प्रारंभी कर्णधार मेग लॅनिंग व अखेरच्या टप्प्यात राधा यादव व शिखा पांडे यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे दिल्लीला सव्वाशेपारची मजल मारता आली. त्यानंतर मुंबईने आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातील दोन बळी झटपट गमविले. पण नंतर कर्णधार हरमनप्रीत व नॅट सिव्हर यांनी तिसऱया गडय़ासाठी 72 धावांची भागीदारी करीत विजयाकडे वाटचाल केली. दिल्लीच्या दर्जेदार क्षेत्ररक्षणामुळे मुंबईला धावांसाठी काही वेळा झगडावे लागले. हरमनप्रीत 37 धावांवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाली. तिने 39 चेंडूत 5 चौकार मारले. नॅट सिव्हरने नंतर अमेलिया केरसमवेत शेवटच्या षटकात विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
शेवटच्या दोन षटकांत मुंबईला 21 धावांची गरज असताना जोनासनने टाकलेल्या 19 व्या षटकात सिव्हर व अमेलिया केर यांनी 3 चौकारांसह 16 धावा वसूल केल्याने शेवटच्या षटकात 5 धावांची गरज राहिली. कॅप्सेच्या या षटकातील तिसऱया चेंडूवर नॅट सिव्हरने यष्टिरक्षकाच्या मागे स्कूप करीत विजयी चौकार मारल्यानंतर मुंबईच्या गोटात जल्लोष सुरू झाला. नॅट सिव्हरने एलिमिनेटर लढतीतही नाबाद 72 धावा फटकावल्या होत्या.
दिल्लीचा डाव कोलमडला
नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम फलंदाजी घेतली. पण दुसऱया षटकापासूनच त्यांच्या डावाला गळती लागली. शेफाली वर्मा व ऍलिस कॅप्से इसी वाँगच्या एकाच षटकात बाद झाल्याने दिल्लीची स्थिती 2 बाद 12 अशी झाली. जेमिमाने चौकाराने सुरुवात केली. पण वाँगने तिला हेली मॅथ्यूजकरवी झेलबाद करीत आपला तिसरा बळी नोंदवला. लॅनिंगने मेरिझेन कॅपसमवेत चौथ्या गडय़ासाठी 37 धावांची भर घातली. पण कॅपचा बळी अमेलिया केरने मिळविल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची घसरगुंडी उडाली. 3 बाद 73 वरून त्यांची स्थिती 9 बाद 79 अशी झाली. केवळ 6 धावांची भर घालून त्यांचे 6 गडी बाद झाले. शिखा पांडे व राधा यादव या शेवटच्या जोडीने आक्रमक फटकेबाजी केल्यामुळेच दिल्ली कॅपिटल्सला शंभरी पार करीत 131 धावांपर्यंत मजल मारता आली. या दोघीनी शेवटच्या दोन षटकांत तब्बल 36 धावांची बरसात केली. शिखाने 17 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह नाबाद 27 तर राधाने केवळ 12 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 225 च्या स्ट्राईकरेटने नाबाद 27 धावा झोडपल्या. या दोघींनी शेवटच्या गडय़ासाठी 4 षटकांत 52 धावांची अभेद्य भागीदारी केली. मुंबई इंडियन्सची हेली मॅथ्यूज सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने केवळ 5 धावा देत 3 बळी मिळविले तर वाँगने 3 बळी मिळविण्यासाठी 42 धावा दिल्या. याशिवाय अमेलिया केरने 18 धावांत 2 बळी टिपत त्यांना पूरक साथ दिली. दिल्लीच्या डावात लॅनिंगने सर्वाधिक 35 धावा केल्या. तिने 29 चेंडूत 5 चौकार मारले. कॅपने 21 चेंडूत 18 तर शेफालीने 4 चेंडूत 11 धावा जमविल्या. पाचजणीव्यतिरिक्त अन्य फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.
संक्षिप्त धावफलक ः दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 9 बाद 131 ः मेग लॅनिंग 35 (29 चेंडूत 5 चौकार), कॅप 18 (21 चेंडूत 2 चौकार), शिखा पांडे नाबाद 27 (17 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), राधा यादव नाबाद 27 (12 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), शेफाली वर्मा 11 (4 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), जेमिमा रॉड्रिग्ज 9, अवांतर 1. गोलंदाजी ः इसी वाँग 3-42, हेली मॅथ्यूज 3-5, अमेलिया केर 2-18, सायका इशाक 0-28, नॅट सिव्हर ब्रंट 0-37.
मुंबई इंडियन्स 19.3 षटकांत 3 बाद 134 ः हेली मॅथ्यूज 13 (12 चेंडूत 3 चौकार), यास्तिका भाटिया 4, नॅट सिव्हर ब्रंट नाबाद 60 (55 चेंडूत 7 चौकार), हरमनप्रीत कौर 37 (39 चेंडूत 5 चौकार), अमेलिया केर नाबाद 14 (चेंडूत 2 चौकार), अवांतर 6. गोलंदाजी ः राधा यादव 1-24, जेस जोनासन 1-28.