महिला प्रिमियर लीग ः 4 मार्च रोजी नवी मुंबईत रंगणार सामना
वृत्तसंस्था/ मुंबई
मुंबई इंडियन्स व गुजरात जायंट्स यांच्यातील लढतीने पहिल्या महिला प्रिमियर लीगची सुरुवात 4 मार्च रोजी होणार असून अंतिम लढत 26 मार्च रोजी होईल, असे बीसीसीआयने मंगळवारी जाहीर पेले.
येथील बेबॉर्न स्टेडियम व नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियम येथे या लीगमधील प्रत्येकी 11 सामने खेळविले जातील. यात एकूण 23 दिवसांत 22 सामने होणार असून 20 लीग सामने, एक एलिमिनेटर व अंतिम लढत असे सामने असतील. सलामीचा सामना व 24 मार्च रोजी होणारा एलिमिनेटर सामना डीवाय पाटील स्टेडियमवर तर अंतिम सामना 26 मार्च रोजी बेबॉर्न स्टेडियमवर खेळविला जाईल.
‘रविवारी 5 मार्च रोजी महिला आयपीएलमधील पहिला डबल हेडर दिवस असेल. या दिवशी आरसीबी व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता ल़ढत होईल,’ असे बीसीसीआयने सांगितले. ‘यूपी वॉरियर्सचा लीगमधील पहिला सामना गुजरात टायटन्सविरुद्ध डीवाय पाटील स्टेडियमवर त्याच दिवशी संध्याकाळी होईल. लीग फेरीतील शेवटचा सामना यूपी वॉरियर्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 21 मार्च रोजी ब्रेबॉर्नवर खेळविला जाईल. एकंदर चार डबल हेडर्स राहणार असून पहिला सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल तर संध्याकाळचा सामना 7.30 पासून खेळविला जाईल,’ असेही त्यांनी सांगितले.
सोमवारी मुंबईत महिलांच्या आयपीएलसाठी लिलाव झाला. त्यात दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर, यूपी वॉरियर्स या पाच संघांनी भाग घेत खेळाडूंना खरेदी करीत आपला संघ तयार केला. या खेळाडूंत राष्ट्रीय तसेच विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना सर्वात महागडी खेळाडू ठरली असून तिला आरसीबीने 3.40 कोटीची बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सने 1.80 कोटी रुपयांना घेतले आहे.
विदेशी खेळाडूंत ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू ऍश्ले गार्डनर व इंग्लंडची अष्टपैलू नताली स्किव्हर यांना सर्वाधिक बोली मिळाली. त्यांना अनुक्रमे गुजरात जायंट्स व मुंबई इंडियन्सने 3.20 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. यू-19 टी-20 विश्वचषक विजेत्या संघाची कर्णधार शेफाली वर्माला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले आहे.
महिला प्रिमियर लीगचे वेळापत्रक
तारीख संघ केंद्र वेळ
4 मार्च गुजरात जायंट्स वि. मुंबई इंडियन्स डीवाय पाटील सायं.7.30
5 मार्च आरसीबी वि. दिल्ली कॅपिटल्स ब्रेबॉर्न दु. 3.30
यूपी वॉरियर्स वि. गुजरात जायंट्स डीवाय पाटील सायं.7.30
6 मार्च मुंबई इंडियन्स वि. आरसीबी ब्रेबॉर्न सायं.7.30
7 मार्च दिल्ली कॅपिटल्स वि. यूपी वॉरियर्स डीवाय पाटील सायं.7.30
8 मार्च गुजरात जायंट्स वि. आरसीबी ब्रेबॉर्न सायं.7.30
9 मार्च दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स डीवाय पाटील सायं.7.30
10 मार्च आरसीबी वि. यूपी वॉरियर्स ब्रेबॉर्न सायं.7.30
11 मार्च गुजरात जायंट्स वि. दिल्ली कॅपिटल्स डीवाय पाटील सायं.7.30
12 मार्च यूपी वॉरियर्स वि. मुंबई इंडियन्स ब्रेबॉर्न सायं.7.30
13 मार्च दिल्ली कॅपिटल्स वि. आरसीबी डीवाय पाटील सायं.7.30
14 मार्च मुंबई इंडियन्स वि. गुजरात जायंट्स ब्रेबॉर्न सायं.7.30
15 मार्च यूपी वॉरियर्स वि. आरसीबी डीवाय पाटील सायं.7.30
16 मार्च दिल्ली कॅपिटल्स वि. गुजरात जायंट्स ब्रेबॉर्न सायं.7.30
18 मार्च मुंबई इंडियन्स वि. यूपी वॉरियर्स डीवाय पाटील दु. 3.30
आरसीबी वि. गुजरात जायंट्स ब्रेबॉर्न सायं.7.30
20 मार्च गुजरात जायंट्स वि. यूपी वॉरियर्स ब्रेबॉर्न दु. 3.30
मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स डीवाय पाटील सायं.7.30
21 मार्च आरसीबी वि. मुंबई इंडियन्स डीवाय पाटील दु. 3.30
यूपी वॉरियर्स वि. दिल्ली कॅपिटल्स ब्रेबॉर्न सायं.7.30
24 मार्च एलिमिनेटर डीवाय पाटील सायं.7.30
26 मार्च अंतिम लढत ब्रेबॉर्न सायं.7.30.