विजयाची प्रतीक्षा, क्रिकेटशौकिनांचे लक्ष
पुणे / प्रतिनिधी
आयपीएलमध्ये आतापर्यंत पाचवेळा विजेती ठरलेली मुंबई इंडियन्स बुधवारी किंग्ज इलेव्हन पंजाबशी भिडणार आहे. सलग चार सामन्यात पराभव पत्करलेल्या मुंबईच्या दृष्टीने हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. चार सामने होऊनही अद्याप मुंबई इंडियन्सची गुणांची पाटी कोरीच आहे. मुंबई आज आपला पहिला विजय नोंदवणार का, याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.
पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र असोसिएशनच्या मैदानात सायंकाळी साडेसातपासून हा सामना रंगणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईची कामगिरी अद्यापर्यंत चांगली झालेली नाही. मात्र, पंजाबविरुद्धचा सामना मुंबईला जिंकावाच लागणार आहे. सलग चार पराभवांमुळे मुंबई नवव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे पंजाबची कामगिरीही संमिश्र झाली आहे. पंजाबने चार सामने खेळून दोन सामन्यात विजय मिळविला आहे. तर, दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
रोहित शर्मा, इशान किशन यांच्या फॉर्मची चिंताही मुंबईच्या संघाला आहे. पहिली मॅच सोडली, तर किशनला म्हणावा तसा सूर गवसला नाही. रोहित शर्मालाही सूर गवसलेला नाही. त्यामुळे मुंबईला धावा काढण्यात अडचण येत आहे. या दोन सलामीवीरांकडून चांगली सलामी मिळत नसल्याने मधल्या फळीवर दबाव येत आहे. यानंतर डेवाल्ड बेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कीरन पोलार्ड अशी फलंदाजी आहे. सूर्यकुमार यादवने सलग दोन अर्धशतके मारुन आपली छाप सोडली आहे. पोलार्डनेही मागच्या सामन्यात आक्रमक फलंदाजी करून मुंबईच्या संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली होती. जसप्रित बुमराह, थंपीवर फास्ट बॉलिंगची मदार आहे. अश्विन, मॉर्गन, मयांक मार्कंडे यांच्यावर फिरकीची मदार आहे.
पंजाबकडेही फलंदाजांची मोठी फळी आहे. मयांक अगरवाल, शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान हे फलंदाजीची बाजू सांभाळतील. लिव्हिंगस्टोन हा फॉर्मात आहे. मात्र, शिखर धवन, मयांक अगरवाल हे सलामीवीर फॉर्मसाठी झगडताना दिसत आहेत. कॅगिसो रबाडा, अर्शदीप सिंग, ओडियन स्मिथ यांच्यावर गोलंदाजीचा भार असणार आहे. तर राहुल चहरवर फिरकीची मदार असेल.
संभाव्य संघ ः मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, बसिल थम्पी, हृतिक शोकीन, बुमराह, जयदेव उनादकट, जोफ्रा आर्चर, मयांक मार्कंडे, मुरुगन अश्विन, रिली मेरेडिथ, टायमल मिल्स, अर्शद खान, डॅनियल सॅम्स, डेवाल्ड ब्रेविस, फॅबियन ऍलन, के. पोलार्ड, संजय यादव, आर्यन जुयल, इशान किशन.
पंजाब किंग्स ः मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, अर्शदीप सिंग, रबाडा, बेअरस्टो, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लिव्हिंगस्टोन, ओडीयन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, रिषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, वृत्तिक चटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नाथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्ष, बेनी हॉवेल.
सामन्याची वेळ ः सायंकाळी 7.30 पासून