युपी वॉरियर्सचा 8 गडय़ांनी पराभव, हरमनप्रित कौर सामनावीर
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
महिलांच्या पहिल्या टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर विजयी घोडदौड कायम राखली आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने रविवारच्या सामन्यात युपी वॉरियर्सचा 8 गडय़ांनी दणदणीत पराभव करून सलग चौथा विजय नोंदविला. नाबाद अर्धशतक झळकविणारी कर्णधार हरमनप्रित कौर हिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
महिलांच्या या स्पर्धेत सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्स संघाने अष्टपैलू कामगिरीवर अधिक भर दिल्याने त्यांनी गेल्या चार सामन्यात एकही पराभव पत्करलेला नाही. मात्र, रविवारच्या सामन्यात कडव्या युपी वॉरियर्स विरुद्ध विजय मिळविण्यासाठी त्यांना थोडे झगडावे लागले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात युपी वॉरियर्सने 6 बाद 159 धावा जमविल्या. त्यानंतर मुंबई इंडियन्सने 17.3 षटकात 2 बाद 164 धावा जमवित हा सामना 15 चेंडू बाकी ठेवून 8 गडय़ांनी जिंकला.
युपी वॉरियर्सच्या डावामध्ये कर्णधार ऍलिसा हिली आणि ताहिला मॅकग्रा यांनी शानदार अर्धशतके झळकविली. हिली आणि मॅकग्रा यांच्या समयोचित फलंदाजीमुळेच युपी वॉरियर्सला 159 धावांपर्यंत मजल मारता आली. हिलीने 46 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 58 तर मॅकग्राने 37 चेंडूत 9 चौकारांसह 50 धावा झळकविल्या. देविका वैद्यने 1 चौकारासह 6, किरण नवगिरेने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17, सिमरन शेखने नाबाद 9 तर दीप्ती शर्माने 1 चौकारासह 7 धावा जमविल्या. हिली आणि मॅकग्रा यांनी तिसऱया गडय़ासाठी 82 धावांची भागीदारी केली. हिलीने किरण नवगिरेसमवेत दुसऱया गडय़ासाठी 50 धावांची भर घातली. या जोडीने ही अर्धशतकी भागीदारी 4.4 षटकात झळकविली. युपी वॉरियर्सच्या डावात 2 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. मुंबई इंडियन्सतर्फे सायका इशाकने 33 धावात 3 तर अमेलिया केरने 33 धावात 2 आणि मॅथ्यूजने 27 धावात 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबई इंडियन्सच्या डावाला मॅथ्यूज आणि यास्तिका भाटिया यांनी दमदार प्रारंभ करून देताना 6.5 षटकात 58 धावांची भागीदारी केली. युपी वॉरियर्सच्या राजेश्वरी गायकवाडने भाटियाला झेलबाद केले. तिने 27 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 42 धावा जमविल्या. मुंबई इंडियन्सचा हा पहिला गडी बाद झाल्यानंतर सलामीची मॅथ्यूज तंबूत परतली. इक्लेस्टोनने स्वतःच्याच गोलंदाजीवर मॅथ्यूजला टिपले. तिने 17 चेंडूत 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या. मुंबई इंडियन्सची यावेळी स्थिती 7.2 षटकात 2 बाद 58 अशी होती.
नॅट स्किव्हर बंट आणि कर्णधार कौर यांनी फलंदाजीची सूत्रे हाती घेत आपल्या संघाला 15 चेंडू बाकी असताना शानदार विजय मिळवून दिला. हरमनप्रित कौर आणि नॅट स्किव्हर बंट यांना नशिबाची साथ चांगली लाभली. अंजली सरवानीच्या गोलंदाजीवर हरमनप्रित फटका मारताना फसली आणि हा चेंडू थेट यष्टीवर आदळला. पण बेल्स पडल्या नाहीत. त्यामुळे हरमनप्रित बाद होताना थोडक्मयात बचावली. तसेच नॅट स्किव्हेर ब्रंट धावचीत होताना थोडक्मयात बचावली. या संधीचा फायदा घेत हरमनप्रितने या स्पर्धेतील आपले दुसरे अर्धशतक झळकविले. तिने 33 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 53 धावा जमविल्या. तर नॅट स्किव्हेर बंटने 31 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 45 धावा जमविल्या. नॅट स्किव्हेर बंटकडून या स्पर्धेत आणखी एक उपयुक्त खेळी पहावयास मिळाली. मुंबई इंडियन्सच्या डावात 3 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. युपी वॉरियर्सतर्फे राजेश्वरी गायकवाड आणि इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या स्पर्धेमध्ये आता मुंबई इंडियन्सने आतापर्यंतचे आपले चारही सामने जिंकून गुणतक्त्यात आघाडीचे स्थान अधिक भक्कम केले आहे.
संक्षिप्त धावफलक
युपी वॉरियर्स 20 षटकात 6 बाद 159 (हिली 58, वैद्य 6, नवगगिरे 17, मॅकग्रा 50, शेख 9, इक्लेस्टोन 1, दीप्ती शर्मा 7, सेहरावत नाबाद 2, अवांतर 9, सायका इशाक 3-33, ऍमिलिया केर 2-33, मॅथ्यूज 1-27), मुंबई इंडियन्स 17.3 षटकात 2 बाद 164 (हरमनप्रित कौर नाबाद 53, नॅट स्किव्हर बंट नाबाद 45, यास्तिका भाटिया 42, मॅथ्यूज 12, अवांतर 12, गायकवाड 1-33, इक्लेस्टोन 1-30).