ऑनलाईन टीम : मुंबई
“महाराष्ट्राच्या विधानसभा सभागृहाला एक तरुण, सुशिक्षित आणि हुशार अध्यक्ष लाभला. या निवडीबद्दल मी राहूल नार्वेकरांचं अभिनंदन करतो. नार्वेकर यांच्यासारख्या माझ्या सहकार्याची निवड या पदासाठी झाली त्याबद्दल मला विशेष आनंद झाला आहे.” असे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचे अभिनंदन केले.
पुढे बोलताना अजित दादा म्हणाले “कुणी काही म्हणूदे तरीही सर्वांना धाकधूक आहे. आमदारांनी आपल्या सद् विवेक बुद्धीला विचारावे की जे घडलं त्यामुळे समाधान मिळालं काय ? ” “शिंदेसाहेब हे एकदा फक्त माझ्या कानात सांगितलं असते तर मी उद्धव ठाकरे य़ांना सांगितले असते ?” असे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोपरखळी मारली.
सभागृहात बोलताना अजितदादा यांनी भाजपला इशारा करताना म्हणाले “नार्वेकर ज्या पक्षात जातात त्या पक्षातील नेर्तृत्वाला जवळ करतात. राष्ट्रवादीत असताना ते माझ्याजवळ होते, शिवसेनेत गेल्यावर ते आदित्य ठाकरे याच्या जवळचे झाले. आता भाजपमध्ये असताना ते फडणवीसांच्या जवळ आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांना जवळ करावे.” असा मिश्किल टोला त्यांनी मारला.