ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुंबईकरांच्या आजच्या दिवसाची सुरुवात आनंदी आणि तणावमुक्त झाली. मुंबईकरांसाठी मुंबई पोलिसांनी संडे स्ट्रीट मोहीम (sunday street mumbai) सुरु केली आहे. आज मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवात रविवारी आनंदी आणि तणावमुक्त झाली. याचे कारण होते त्यांच्यासाठी पोलिसांनी मोकळे करून दिलेले रस्ते. या मोकळ्या रस्त्यांवर मोकळा श्वास घेतानाच मुंबईकरांनी योगासने, कराटे, गायन, तलवारबाजी यांसह अनेक मार्गांनी चार तास अगदी मनमुराद आनंद लुटला. पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या ‘संडे स्ट्रीट’ संकल्पनेला मुंबईकरांनी पहिल्याच रविवारी चांगला प्रतिसाद दिला. आज मरीन ड्राईव्ह परिसरात संडे स्ट्रीट मोहीम पार पडली, या मोहिमेला मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (sanjay pande), राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse-pati), अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar) तसेच पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील (vvishwas nangare patil) यांनी हजेरी लावली होती.
पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून मुंबईकरांसाठी संडे स्ट्रीट मोहीम सुरु करण्यात आली आहे. आज अक्षय कुमारने या मोहिमेला उपस्थिती लावली. या ठिकाणी आज येऊन मला आनंद झालाय. कोरोना काळात सर्वत्र शांतता होती. मात्र यानंतरचे चित्र दिलासाजनक आहे. ही संडेस्ट्रीट कल्पना कायम राहावी केवळ रविवारीचं नाही तर दररोज व्यायाम करावा. सर्व लोकांसोबत चांगले संबंध जोडण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे. आपल्या पोलीस दलातही अनेक कलाकार आहेत, असे अक्षय कुमार म्हणाला.
तसेच संजय पांडे यांनी नरिमन पॉइंट येथे सहभागी होत मुंबईकरांचा उत्साह वाढविला. अनेकांनी धावण्याचा, सायकल चालविण्याचा आनंद लुटला. कुणी मनमुराद गाणी गायिली. त्या जोडीला योगासने, कराटे प्रशिक्षण, स्वरक्षणासाठी तलवारबाजीचे प्रात्यक्षिक असे ज्याला जे आवडेल ते सर्वजण मनमुराद करताना दिसले. पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी ‘संडे स्ट्रीट’मध्ये सहभाग घेतला. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या संकल्पनेला असाच प्रतिसाद मिळाला तर ती कायम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.