Tarun Bharat

तडाखेबंद सलामीनंतर मुंबईची घसरगुंडी

मध्यप्रदेशविरुद्ध रणजी फायनल ः पहिल्या दिवसअखेर मुंबई 5 बाद 248,

बेंगळूर / वृत्तसंस्था

Advertisements

पृथ्वी शॉ (79 चेंडूत 47) व यशस्वी जैस्वाल (163 चेंडूत 78) यांनी 87 धावांची सलामी दिल्यानंतरही मुंबईला मध्यप्रदेशविरुद्ध रणजी चषक स्पर्धेतील अंतिम लढतीत पहिल्या दिवसअखेर 5 बाद 248 अशा माफक धावसंख्येवर समाधान मानावे लागले. आपल्या 42 व्या जेतेपदासाठी महत्त्वाकांक्षी मुंबईला पहिल्या डावात 400 पेक्षा अधिक धावांचा टप्पा सर करण्यासाठी आता सर्फराज खान (नाबाद 40) व शम्स मुलानी (नाबाद 12) यांच्याकडून अपेक्षा असतील.

मध्यप्रदेशतर्फे डावखुरा फिरकीपटू कुमार कार्तिकेयने एका एण्डकडून 31 षटके गोलंदाजी करत 91 धावात 1 बळी घेतला. त्या तुलनेत सीमर गौरव यादव (23-5-68-0) बळी घेण्याच्या निकषावर कमनशिबी ठरला. गौरव यादवने मुंबईच्या फलंदाजांवर विशेषतः कर्णधार पृथ्वी शॉवर दडपण राखण्यात कमालीचे यश प्राप्त केले.

गौरवने मुंबईच्या फलंदाजांवर निर्माण केलेल्या दडपणाचा अनुभव अगरवाल (19-3-56-2) व उंचापुरा ऑफस्पिनर सारांश जैन (17-2-31-2) यांनी उत्तम लाभ घेतला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या तासाभरात याचा त्यांना लाभही झाला. पण, त्यानंतर मध्यप्रदेशच्या गोलंदाजांनी आपला गेमप्लॅन काटेकोर राबवत मुंबईवर वर्चस्व निर्माण केले.

प्रारंभी, कार्तिकेयकडे नवा चेंडू सोपवण्याची चाल जैस्वाल व शॉच्या आक्रमणामुळे त्यांच्यावरच उलटल्याचे चित्र होते. जैस्वालने त्याला पुढे सरसावत षटकार वसूल केला तर शॉने देखील तोच कित्ता गिरवत लाँगऑफच्या दिशेने सीमापार पिटाळून लावले. जैस्वाल ड्राईव्ह व कटच्या नजाकतदार फटक्याच्या बळावर मध्यप्रदेशच्या गोलंदाजांवर बरसत राहिला. मात्र, 5 चौकार व 1 षटकार फटकावल्यानंतरही शॉच्या खेळात नेहमीची सहजता नव्हती. अनुभव व गौरव या मध्यप्रदेशच्या दोन्ही गोलंदाजांना उत्तम मुव्हमेंट लाभली आणि याचा त्यांनी लाभही घेतला.

मुंबईच्या डावातील 12 व्या षटकात गौरवने पहिला चेंडू इनकटर टाकला व त्यानंतर बाहेर जाणारे चेंडू टाकण्यावर भर दिला. यात शॉचा अंदाज सातत्याने चुकत राहिला. दुसरीकडे, जैस्वालने पहिल्या 30 धावा 52 चेंडूत केल्या. एकदा जम बसल्यानंतर त्याने सावध खेळ करीत पुढील 48 धावा 111 चेंडूत वसूल केल्या. यष्टीच्या नजीक मारा करण्यावर भर देणाऱया अनुभव अगरवालने शॉचा त्रिफळा उडवत पहिले यश मिळवून दिले.

अरमान जाफरने (56 चेंडूत 26) कार्तिकेयच्या गोलंदाजीवर फॉरवर्ड-डिफेन्सचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावण्यापूर्वी उत्तम फटकेबाजी केली होती. पुढे कार्तिकेयच्या गोलंदाजीवर अंदाज चुकल्यानंतर शॉर्ट मिडविकेटवरील यश दुबेने जाफरचा सोपा झेल टिपला. त्यानंतर दुसऱया सत्रात खेळपट्टी मंदावली आणि याचा मध्यप्रदेशच्या गोलंदाजांनी लाभ घेतला. प्रारंभी, सुवेद पारकरने 18 धावांवर सारांशच्या थांबून आलेल्या चेंडूवर प्रतिस्पर्धी कर्णधार आदित्य श्रीवास्तवकडे सोपा झेल दिला. पुढे, जैस्वाल स्क्वेअर कट मारण्याच्या प्रयत्नात गलीवर तैनात दुबेकडे झेल देत तंबूत परतला. यामुळे, जैस्वालची हंगामातील चौथ्या शतकाची संधी हुकली. हार्दिक तमोरेने 24 धावांवर पहिल्या स्लीपमधील रजत पाटीदारकडे सोपा झेल दिला.

संक्षिप्त धावफलक

मुंबई पहिला डाव ः 90 षटकात 5 बाद 248 (यशस्वी जैस्वाल 163 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह 78, पृथ्वी शॉ 79 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 47, सर्फराज खान 125 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 40, हार्दिक तमोरे 3 चौकारांसह 24, शम्स मुलानी नाबाद 12. अवांतर 3. सारांश जैन 17 षटकात 2-31, अनुभव अगरवाल 19 षटकात 2-56, कुमार कार्तिकेय 31 षटकात 1-91).

Related Stories

पाक -झिंबाब्वे पहिली वनडे आज रावळपिंडीत

Patil_p

डय़ुसेन म्हणतो, आम्ही आयपीएलमुळे जिंकलो!

Patil_p

बार्सिलोना, बायर्न म्युनिच उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

नदालचे पुनरागमन विजयाने, मरेची स्पर्धेतून माघार

Amit Kulkarni

लंकन संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी मलिंगा

Patil_p

आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी महिला संघ घोषित

Patil_p
error: Content is protected !!