वैज्ञानिकांना थक्क करून सोडणारा शोध
इजिप्तच्या एका मकबऱयात पहिल्यांदाच एकत्रित स्वरुपात 10 मगरींची ममी आढळून आली आहे. या ममींमुळे इजिप्तच्या प्राचीन ममी तयार करण्याच्या प्रक्रियेसंबंधी खुलासा होणार आहे. तसेच मगरींची ममी तयार करण्यामागील कहाणीचा उलगडा होणार आहे. कारण यापूर्वी मांजर आणि अन्य प्राण्यांची ममी मिळाल्या आहेत, परंतु इतक्या मगरींची ममी एकत्र मिळणे रहस्यच ठरले आहे.
इजिप्तमध्ये वाहणाऱया नाइल नदीच्या पश्चिम काठावर असलेल्या एका मकबऱयात 10 मगरींच्या ममी मिळाल्या आहेत. या मकबऱयाचे नाव कूब्बत अल-हवा आहे. मगरींच्या या ममी सुमारे 2500 वर्षे जुन्या असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राचीन इजिप्तमध्ये प्रजननाचे देवता सोबेक यांना खूश करण्यासाठी लोक मगरींचा बळी द्यायचे. कारण इजिप्तच्या पौराणिक कहाणींनुसार सोबेक या देवतेचे शीर मगरीचे होते आणि शरीर मानवी होते. ममींमधील मगरी या दोन वेगवेगळय़ा प्रजातींच्या असू शकतात असे मानले जात आहे.
इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीत मगरीला मोठे स्थान आहे. मगरीला तेथे देवतेशी जोडून पाहिले जाते. तसेच मगरीचा खाद्य म्हणूनही वापर केला जातो. याच्या शरीराच्या वेगवेगळय़ा हिस्स्यांचा वापर होतो. मगरीच्या फॅटद्वारे औषधे तयार केली जातात, ही औषधे अंगदुखी, टक्कलावरील उपचारासाठी वापरली जातात. इजिप्तमध्ये यापूर्वी इबिसेस, मांजर आणि माकडांच्या ममी आढळल्या होत्या.
यापूर्वी देखील मगरींच्या ममी मिळाल्या आहेत, परंतु त्या छोटय़ा मगरींच्या होत्या. पहिल्यांदाच मोठय़ा प्रमाणात प्रौढ मगरींच्या ममींचा शोध लागला आहे. रॉयाल बेल्जियन इन्स्टीटय़ूट ऑफ नॅचरल सायन्सेसच्या ऑर्कियोजुओलॉजिस्ट डॉ. बी दे कुपेरे यांनी सर्वसाधारणपणे आम्हाला तुकडय़ांमध्ये गोष्टी मिळतात, परंतु पहिल्यांदाच एखाद्या मकबऱयात 10 मगरींच्या ममी मिळाल्याचे म्हटले आहे.
कूब्बत अल-हवा येथे पोहोचल्यावर मगरींच्या ममी पाहून मी थक्क झाले. यापूर्वी 2018 मध्ये देखील मगरींच्या ममी मिळाल्या होत्या, परंतु त्या मगरी कमी वयाच्या होत्या असे कुपेरे यांनी सांगितले. त्यांनी ममींमधील मगरींचे दात, हाडं आणि प्राचीन मलासमवेत अनेक हिस्स्यांचे अध्ययन केले आहे.
10 ममींपैकी पाच मगरींच्या शरीराचा केवळ शीराचा भाग शिल्लक राहिला आहे, एक मगर 7 फूट लांबीची असून तिच्या शरीराचा जवळपास पूर्ण हिस्सा योग्यस्थितीत आहे. या मगरींना विशेष वस्त्राने गुंडाळण्यात आले होते. वैज्ञानिकांना आता या मगरींचे अध्ययन करण्यासाठी सीटी स्कॅन आणि एक्स-रेची मदत घ्यावी लागणार असल्याचे त्या म्हणाल्या. या मगरींच्या प्रजातींचा शोध घेण्याचे काम वैज्ञानिकांना करावे लागणार आहे. तसेच या मगरींना कशाप्रकारे मारण्यात आले किंवा जिवंतच ममीचे स्वरुप देण्यात आले हे शोधून काढावे लागणार आहे.