मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांसह स्वच्छता कामगारांचे मागण्यांसाठी आंदोलन
बेळगाव : सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात यावे व जुन्या पद्धतीने निवृत्ती वेतन देण्यात यावे अशा विविध मागण्यांकरिता सरकारी नोकर संघटनांनी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय बेळगाव महापालिका नोकर संघटनेने घेतला असून, बुधवारपासून काम बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे महापालिकेचे कामकाज बेमुदत बंद राहणार आहे. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे. सरकारी नोकर संघटनेच्यावतीने या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलन छेडून शासनाला निवेदन सादर केले होते. पण याची दखल घेण्यात आली नाही. अलिकडेच झालेल्या चर्चेदरम्यान मार्च अखेरपर्यंत सातव्या आयोगानुसार वेतन देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मात्र आगामी काळात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने तात्काळ सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. याकरिता राज्यातील सरकारी नोकर संघटनांच्यावतीने दि. 1 मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनास बेळगाव महापालिका नोकर विकास संघटनेच्यावतीने तसेच बेळगाव महापालिका एससी एसटी नोकर संघटना व स्वच्छता कर्मचारी संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे. मंगळवारी महापालिका नोकर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी या आंदोलनाबाबत चर्चा करून आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बुधवारपासून महापालिका कार्यालयातील कामकाज बंद ठेवण्याचे ठरविण्यात आले. सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात यावे, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य संजीवनी आणि केजीआयडी, जेपीएफ आदी सुविधा मिळाव्यात. कंत्राट पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना सेवेत कायम करण्यात यावे तसेच जुन्या पेन्शन पद्धतीने निवृत्तीवेतन देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन छेडण्यात येणार आहे.
नागरिकांची कामे रखडणार
गेल्या 15 दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या तयारीत महापालिकेचे कर्मचारी गुंतले होते. तसेच विधनसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मतदान यंत्रे तपासणीच्या कामात कर्मचारी व्यस्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली आहेत. आता सातवे वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी काम बंद आंदोलन छेडण्यात येणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.