गाळेधारकांना त्वरित नवीन गाळय़ामध्ये ताबा घेण्याची नाटीस : तळमजल्यावर म्हापशात गाळे देण्याची गाळेधारकांची मागणी
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा गांधी चौक जवळील पर्रा मार्गे असलेले 13 गाळे त्वरित खाली करावे व कदंब कॉम्प्लेक्स म्हापसा टॅक्सी स्थानकावर दिलेल्या गाळय़ावर त्वरित ताबा घ्यावा असा आदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार म्हापसा पोलिकेने या 13 ही गाळेधारकांना अंतिम नोटीस बजावली असता या नोटीशीला या गाळेधारकांनी तीव्र विरोध दर्शवित उद्या आमचे गाळे मोडण्यास आल्यास त्याविरुद्ध आम्ही प्राणही द्यायला तयार आहेत. आम्हाला पहिल्या मजल्यावर स्थलांतरीत न करता म्हापशात तळमजल्यावरच गाळे द्यावे अन्यथा आमच्या गाळय़ाच्यामागे असलेल्या खुल्या जागेत आम्हाला नवीन गाळे बांधून द्यावेत अशी मागणी येथील गाळेधारकांनी केली आहे. आम्हा गरीब लोकांच्या पोटावर न मारता मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणीही केली आहे. दरम्यान येत्या दोन दिवसात हे सर्व गाळे जमीनदोस्त करण्यासाठी पालिकेने निर्णय घेतला असून यासाठी सर्व सामुग्री तयार ठेवली असल्याची माहिती पालिका सूत्रांकडून देण्यात आली.
उच्च न्यायालयापेक्षा पालिका श्रेष्ठ काय- संजय बर्डे
यावेळी म्हापशातील समाजसेवक संजय बर्डे यांनी याठिकाणी येऊन पाहणी केली व ते म्हणाले की, राज्यात सध्या विधानसभा अधिवेशन सुरू आहे. आमदार जोशुआ डिसोझा म्हापशाचे प्रश्न सोडविण्यास बसले आहे. तसेच मंत्री विश्वजीत राणे आज बेकायदेशीर कृतीबाबात आवाज उठवित आहे. उच्च न्यायालयाचा आदेश न जुमता पालिका म्हापसा येथील 13 गाळे मोडकळीस काढण्यास पाहत आहे. उच्च न्यायालयाची याची येत्या 19 रोजी निवाडा असून त्यापूर्वीच पालिका हे गाळे जमीनदोस्त करू पाहत आहे असा आरोप संजय बर्डे यांनी केला. दोन दिवसात हे गाळे खाली करण्यास लावले आहे. विकास करताना गरिबांच्या पायावर पाय ठेवून गाळे मोडू नका. येथे मॅकानिक, लेट, चाव्या करणारे दुकाने आहेत त्यांना पहिल्या मजल्यावर कसे काय आपला व्यवसाय करता येईल असे बर्डे म्हणाले. पालिका मुख्याधिकाऱयांनी याकडे लक्ष द्यावे असे ते म्हणाले.
पहिल्या मजल्यावर आम्ही आमचे गाळे कसे थाटणार- गजानन नाईक
गजानन नाईक म्हणाले, आपले कोल्डड्रींक दुकान आहे ते पहिल्या मजल्यावर कोणत्याच परिस्थितीत चालणार नाही हे कित्येकदा पालिकेच्या लक्षात आणून दिले. आम्हाला तळमजल्यावर गाळे द्या अशी मागणीही केली. आता चतुर्थी पोचली आहे. आमची सतावणूक का. आम्ही आमदारांशी संपर्क साधला असता आपल्या वडिलांनी तुमची व्यवस्था वर केली असल्याचे सांगत आहे. आम्ही तेथे वर आमची दुकाने कशी थाटणार. आम्ही वयोवृद्ध झालो मात्र आमचा प्रश्न सुटत नाही. न्यायालयाची नोटीस आम्हाला कधी आली नाही. आम्ही न्यायालयात गेलो नाही मग येथे उच्च न्यायालय कुठून आले असे नाईक म्हणाले.
पहिल्या मजल्यावर मोटारसायकल, चाव्या दुरुस्त कशा करणार- चंद्रकांत पेडणेकर
चंद्रकांत पेडणेकर म्हणाले, आपण मोटारसायकल दुरुस्त करतो. पहिल्या मजल्यावर आपण आपला व्यवसाय कसा करणार हे उच्च न्यायालयाने सांगावे असे त्यांनी सांगितले. भारत च्यारी म्हणाले की, येथे आपण चाव्या करतो. येथे राज्यातून आपल्याकडे वयोवृद्ध तसेच सर्वजण चाव्या करण्यासाठी गाडय़ा घेऊन येतात. पहिल्या मजल्यावर आपण वर खाली ये-जा करून चाव्या कसे काय करणार अशी जाब त्यांनी विचारली. येथे गॅरेज, लेट आदी आहे ती वर नेण्यास येणार नाही. आम्हाला सरकारने न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
स्वयंरोजगाराच्या नावाखाली आम्ही व्यवसाय करतो- दत्ताराम पेडणेकर
दत्ताराम पेडणेकर म्हणाले, आम्ही 13 जण इकडे गेली अनेक वर्षापासून आपला व्यवसाय करून पोट भरीत आहे. आपला कपडय़ांचा गाळा आहे. आम्ही रस्त्यावर येण्याचे कारण म्हणजे आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली असता आमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी 19 तारीख दिली आहे मात्र म्हापसा पालिका 14 जुलै रोजी आमचे गाळे मोडू पाहत आहे ही हुकुमशाही का. असा आम्हाला प्रश्न पडला आहे. स्वयंरोजगारांच्या नावाखाली आम्ही व्यवसाय करीत आहे मात्र सरकारला आमची कळकळ नाही. तेथे पहिल्या मजल्यावर काहीच साधन सुविधा नाही. स्टेअरकेस नाही. आठ चौमीटर जागेत आम्ही काय व्यवसाय करणार. 13 जणांना पालिकेने थेट वर स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला आहे असे पेडणेकर म्हणाले. आम्ही विकासाबरोबर आहोच पण आम्हाला तळमजल्यावर जागा द्या आम्हाला न्याय मिळणार असे आम्ही मनी धरतो.
दुकानामागील जागेत सामावून घ्या- शेखर घाडी
येथील गाळेधारक शेखर धारक म्हणाले की, 5 ते 6 हजार जागा आमच्या दुकानामागे आहे तेथे स्थनिक शेतकरी व आम्हा गाळेधारकांना सामावून घ्या. तेथे कुणाचीही हरकत नाही. बस स्थानकावरही जागा आहे अन्यथा तेथे सामावून घ्या. आमदार म्हणतात आपल्या वडिलांनी सर्वकाही करून ठेवले आहे. भिण्याची गरज नाही. ते बरे आहे जागा इतकी आहे पालिका क्षेत्रात. कोमुनिदादची जागा भरीव आहे तेथे आम्हाला सामावून घ्या असे घाडी म्हणाले. कळंगूट ते म्हापसा रस्त्यावर सर्वांना सामावून घेण्यात आले मग आमच्यावर हा अन्याय का असा प्रश्न घाडी यांनी उपस्थित केला.
…अन्यथा आम्ही कायदा हातात घेणार
आम्हाला पालिकेने दुसरीकडे गाळे देतो असे स्पष्ट सांगितले होते मात्र नेमके कुठे देतो हे स्पष्ट केले नव्हते. आम्हाला छोटे गाळे द्या पण तळमजल्यावर द्या अशी मागणी यावेळी 13 गाळेधारकांनी केली. यापूर्वी तळमजल्यावरून कुणालाच पहिल्या मजल्यावर जागा दिली नाही मग आमच्यावरच आघात का? असे गाळेधारक म्हणाले. तळमजल्यावर आम्हाला द्या त्यासाठी खर्च आल्यास आम्ही देण्यास तयार आहे. आम्ही हुकुमशाही केली तर गाळे मोडण्यास देणार नाही. आम्ही कुणीच वर गाळे घेतले नाही. आम्ही 13 जण एकसंघ आहोत. गाळे मोडण्यास आल्यास आम्ही कायदा हातात घेणार असे गाळेधारकांनी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे त्या ठिकाणी पाणी, वीज आणि शौचालयाचीही सोय नसल्याचे त्यांनी सांगितले.