31 डिसेंबरपर्यंत मालमत्तांची माहिती केएमएफ-24 वर नोंद करण्याचे उद्दिष्ट
प्रतिनिधी /बेळगाव
केएमएफ-24 अंतर्गत शहरातील मालमत्तांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. महसूल विभागासह आरोग्य विभागातील कर्मचाऱयांवरही सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे मनपा कार्यालय ओस पडले असून, सध्या सर्व कर्मचारी मोजमापाच्या कामात गुंतले आहेत.
केएमएफ-24 मध्ये सर्व मालमत्तांची नोंद करण्याचा आदेश नगरविकास खात्याने बजावला आहे. त्यामुळे प्रत्येक मालमत्तेची मोजमाप करून माहिती घेण्यासाठी महापालिकेच्या 174 कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका व्याप्तीतील 58 वॉर्डांमध्ये 1 लाख 40 हजार मालमत्ता असून, जुन्या मालमत्तांचे सर्वेक्षण आणि नवीन मालमत्तांचे मोजमाप करून माहिती घेणे बंधनकारक आहे. जुन्या मालमत्तांमध्ये नव्याने करण्यात आलेल्या सुधारणा किंवा बांधकामाची माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक मालमत्तेचे मोजमाप करणे गरजेचे आहे. ही मोहीम राबविण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला असून, महसूल आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱयांवर जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी या कामात गुंतले आहेत. घरोघरी जाऊन मालमत्तांची माहिती घेण्यासह मोजमाप करण्यात येत आहे. अर्धा दिवस मोजमापाचे काम व अर्धा दिवस कार्यालयीन काम करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे महापालिका कार्यालय सकाळच्या सत्रात ओस पडत आहे. विविध कामांसाठी कार्यालयात येणाऱया नागरिकांना आता सायंकाळी फेरी मारावी लागत आहे. दि. 31 डिसेंबरपर्यंत सर्व मालमत्तांची माहिती केएमएफ-24 वर नोंद करण्याचे उद्दिष्ट कर्मचाऱयांना देण्यात आले आहे. याचदरम्यान हिवाळी अधिवेशन बेळगावात होत असल्याने त्या कामाची जबाबदारीही कर्मचारी व अधिकाऱयांवर असल्याने याकरिता धावपळ करावी लागत आहे. परिणामी नागरिकांच्या कामांचा बोजवारा उडाला आहे.