ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके (Rituja Latke) यांचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांवर दबाव असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महापालिका पूर्णपणे स्वायत्त असून, आमचा कोणावरही दबाव नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.
फडणवीस म्हणाले, महापालिका ही पूर्णपणे स्वायत्त आहे. कोणाचा राजीनामा घ्यायचा, कोणाचा नाही हे पालिका ठरवेल. त्यामध्ये आमचा हस्तक्षेप नाही. आम्ही कोणावरही दबाव आणला नाही. अंधेरीची पोटनिवडणूक बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहोत. कोण उमेदवार द्यायचा याचा निर्णय चर्चेतून घेतला जाईल. आमच्याकडून ही कोण निवडणूक लढणार याची घोषणा आम्ही लवकरच करू.
अधिक वाचा : सिंहगड एक्स्प्रेसमध्ये बसण्याच्या जागेवरुन तुंबळ हाणामारी
लटके या मुंबई महापालिकेत लिपीक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी महिनाभरापूर्वी राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांचा राजीनामा मंजूर न करण्याचे तंत्र वापरले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते ऍड. अनिल परब आणि किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. नियमांनुसार, ऋतुजा लटके या तृतीय श्रेणीतील कर्मचारी असून त्यांचा राजीनामा आयुक्तांपर्यंत न जाता विभागीय पातळीवर मंजूर होणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. येथे दबावतंत्र वापरण्यात येत आहे. याप्रकरणी शिवसेना कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे परब यांनी म्हटले होते.