प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील ओल्या कचऱयाचे प्रमाण वाढल्याने स्थानिक पातळीवर कचऱयावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, याची अंमलबजावणी झाली नव्हती. अखेर शहरातील पहिला बायोगॅस प्रकल्प मार्गी लागला असून नेहरूनगर येथे उभारण्यात आलेला बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. लवकरच या प्रकल्पाचे रितसर उद्घाटन करण्यात येणार आहे.
ओला आणि सुका कचरा वेगळा जमा करण्याची मोहीम स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू करण्यात आली. ओल्या कचऱयावर प्रक्रिया करून तुरमुरी येथे खत उत्पादन केले जाते. मात्र, वाहतूक आणि प्रक्रिया करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च होत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर ओल्या कचऱयावर प्रक्रिया करण्याच्यादृष्टीने शहर परिसरात बायोगॅस प्रकल्प राबविण्याचा निर्णय महापालिका सभागृहात घेण्यात आला होता. बायोगॅसपासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प राबविण्यासाठी महापालिकेने निधीची तरतूद करून प्रस्ताव तयार केला होता. मात्र, जर्मन टेक्नॉलॉजीनुसार राबविण्यात येणारा वीज निर्मितीचा बायोगॅस प्रकल्प अयोग्य असल्याची टिप्पणी नगरविकास खात्याने केली. त्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे. मात्र, शहरातील कचऱयाची विल्हेवाट लावणे अनिवार्य असल्याने महापालिकेने बायोगॅस प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला होता.
विविध ठिकाणी कमी क्षमतेचे बायोगॅस प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेऊन निविदा काढल्या होत्या. जुने बेळगाव, खासबाग, उद्यमबाग, नेहरूनगर आणि एपीएमसी मार्केटयार्ड अशा ठिकाणी प्रकल्प राबविण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. यापैकी नेहरूनगर येथील प्रकल्प पूर्णत्वास आला असून प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. ए. जे. ग्रीन सोल्युशन्स ऍण्ड डिझाईन्स या कंपनीने नेहरूनगर येथे बायोगॅस प्रकल्पाची उभारणी केली आहे. 500 किलो कचऱयावर प्रक्रिया करून स्वयंपाकाचा गॅस उत्पादन करण्याचा प्रकल्प पूर्ण झाला आहे. या ठिकाणी इंदिरा कॅन्टीनचे स्वयंपाक घर असल्याने इंदिरा कॅन्टीनचा कचरा आणि महापालिकेकडे जमा कचऱयावर प्रक्रिया करून उत्पादन केले जाणार आहे.
बायोगॅस उत्पादनाची यंत्रोपकरणे बसविण्याचे काम पूर्ण झाले असून ओला कचरा बारीक करण्यासाठी ग्राईंडर, कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी डायजेस्टर बसविण्यात आला आहे. डायजेस्टरमध्ये घालण्यात आलेल्या कचऱयापासून गॅस तयार होतो. हा गॅस जमा करण्यासाठी 10 क्मयुबिक क्षमतेचा बलून बसविण्यात आला आहे. म्हणजेच दररोज 500 किलो कचऱयापासून 2 सिलिंडर गॅस उत्पादन होणार आहे. मार्केटयार्ड व विविध ठिकाणी जमा होणारा ओला कचरा आणि इंदिरा कॅन्टीनमधील कचरा या प्रकल्पासाठी वापरण्यात येत आहे. कचऱयापासून गॅस निर्मिती करण्यास प्रारंभ झाला असून सदर गॅस इंदिरा कॅन्टीनला दिला जाणार आहे. याची चाचणी बुधवारी करण्यात आली. बेळगावातील महापालिकेचा पहिला बायोगॅस प्रकल्प तयार झाला असून कचऱयापासून गॅस उपलब्ध होणार आहे. इंदिरा कॅटीनला स्वयंपाक बनविण्यासाठी दररोज 2 सिलिंडरची गरज असते. त्यामुळे या बायोगॅसच्या माध्यमातून गॅसपुरवठा केला जाणार आहे. या प्रकल्पाचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
गॅस निर्मिती प्रकल्पाचे काम पूर्ण
कचऱयापासून गॅस निर्मितीच्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून दररोज 500 किलो कचरा यामध्ये घातला जातो. या माध्यमातून दोन सिलिंडर गॅस उत्पादन होते. या गॅसला गळती लागल्यास लगेचच हवेत मिसळतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका नाही. गॅसचा प्रेशर वाढविण्यासाठी कॉम्प्रेसर बसविण्यात आला असल्याची माहिती प्रकल्प राबविणाऱया कंपनीचे प्रतिनिधी लक्ष्मीनारायण यांनी दिली.