वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ग्रीसमध्ये चेनिया येथे सुरू असलेल्या व्हेनीझेलेव चॅनिया 2022 आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताचा ऍथलीट मुरली श्रीशंकरने पुरूषांच्या लांब उडीत सुवर्णपदक पटकाविताना 7.95 मी. चे अंतर नोंदविले.
केरळच्या 23 वर्षीय मुरली श्रीशंकरने गेल्या महिन्यात लांब उडी प्रकारात 8.36 मी. चा राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. ग्रीसमधील या स्पर्धेत पुरूषांच्या लांब उडीत फ्रान्सच्या ज्युलेस पोमेरीने 7.73 मी.चे अंतर नोंदवित रौप्यपदक तर फ्रान्सच्या इरवान कोनेटने 7.71 मी. अंतर नोंदवीत कांस्यपदक मिळविले. ग्रीसमधील कॅलिथिया येथे झालेल्या 12 व्या आंतरराष्ट्रीय जंपींग स्पर्धेत मुरली श्रीशंकरने 8.31 मी.चे आंतर नोंदवित सुवर्णपदक मिळविले होते. 2022 साली होणाऱया विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी मुरली श्रीशंकरने यापूर्वीच आपले तिकीट आरक्षित केले आहे.