वृत्तसंस्था /मोनॅको
राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यजेता लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने आपल्या पदार्पणाच्या डायमंड लीग स्पर्धेत सहावे स्थान मिळवले. त्याला 7.94 मीटर्स अशा अपेक्षेपेक्षा कमी कामगिरीवर समाधान मानावे लागले.
बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक रौप्य जिंकल्यानंतर सहाव्या दिवशीच तो या स्पर्धेत सहभागी झाला. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत 10 ऍथलिट्सला प्रारंभी प्रतिकूल वाऱयाचा सामना करावा लागला. पण, नंतर येथील परिस्थिती अनुकूल होत गेली. श्रीशंकरने सहा दिवसांपूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेत 8.08 मीटर्सच्या सर्वोत्तम लांब उडीसह रौप्य जिंकले. त्याची हंगामातील व वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 8.36 मीटर्स इतकी आहे.
23 वर्षीय मुरली श्रीशंकरने 7.61 मीटर्स झेप घेत सुरुवात केली. त्यानंतर त्याने 7.84 मीटर्स व 7.83 मीटर्सची झेप नोंदवली. तो पहिल्या फेरीअखेर सहाव्या स्थानी होता. मात्र, तिसऱया फेरीअखेर तो अगदी आठव्या स्थानापर्यंत फेकला गेला. केवळ आठव्या स्थानी आल्यामुळे त्याला आव्हान संपुष्टात येण्याची नामुष्की निसटत्या फरकाने टाळता आली.
श्रीशंकरने चौथ्या फेरीत 7.69 मीटर्स तर पाचव्या फेरीत 7.94 मीटर्सची झेप नोंदवली. यासह तो तालिकेत सहाव्या स्थानी राहिला. डायमंड लीग स्पर्धेतील सुधारित ‘फायनल थ्री’ नियमानुसार केवळ पहिल्या तीन स्पर्धकांनाच सहावा व शेवटचा अटेम्प्ट देण्यात येतो.
क्युबाच्या टोकियो ऑलिम्पिक कांस्यजेत्या डेन्डी मॅस्सोने 8.35 मीटर्सची झेप घेत सुवर्ण जिंकले. वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यजेत्या व विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन ग्रीसचा मिल्टियाडिसने (8.31 मीटर्स) दुसरे तर अमेरिकेच्या मॅर्क्विसने (8.31 मीटर्स) तिसरे स्थान मिळवले. टेन्टोग्लूने मिल्टियाडिसने आपली दुसरी सर्वोत्तम झेप 8.30 मीटर्सची नोंदवली तर डेन्डीने 8.30 मीटर्स व 8.17 मीटर्स असे दोन बेस्ट जम्प नोंदवले.
जमैकाचा 2019 वर्ल्ड चॅम्पियन सुवर्णजेता टेजॅय गेलने 8.06 मीटर्स उडीसह चौथे स्थान मिळवले. वर्ल्ड इनडोअर रौप्यजेता स्वीडनचा थॉबियस 7.96 मीटर्स उडीसह पाचव्या स्थानी आला. भारताचा मुरली श्रीशंकर आता स्वित्झर्लंडमधील लुसाने येथील वर्ल्ड ऍथलेटिक्स टूरमध्ये सहभागी होत आहे.