न्यूपोर्ट न्यूज शहरात स्टोअरमध्ये लूट
वृत्तसंस्था/ न्यूपोर्ट न्यूज
अमेरिकेच्या न्यूपोर्ट न्यूज शहरातील कन्वीनियन्स स्टोअरमध्ये बुधवारी रात्री एका अमेरिकन नागरिकासह गुजराती युवकाची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली आहे. मृतांची नावे प्रेयस पटेल आणि एडवर्ड थॉमस अशी आहेत. गुजरातच्या आणंद शहराचे रहिवासी प्रेयस हे कन्वीनियन्स स्टोअरमध्ये काम करत होते. गुंडांनी दोघांची हत्या केल्यावर कॅशबॉक्स आणि काही सामग्रीसह पळ काढला आहे. ही पूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
लुटारूंनी रोख रक्कम मिळविण्यासाठी प्रथम थॉमसला मारहाण करण्यास सुरुवात केली असता प्रेयसने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला होता. याचदरम्यान एका लुटारूने प्रेयस आणि थॉमस यांच्यावर गोळय़ा झाडल्या. प्रेयस सुमारे एक वर्षापासून न्यूपोर्ट न्यूज शहरातील या स्टोअरमध्ये काम करत होते. तीन चेहरे झाकलेल्या लुटारूंनी त्यांची हत्या केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर काही अश्वेत संशयितांना ताब्यात घेतले आहे.