सुलधाळजवळ घटना उघडकीस : अंकलगी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल
प्रतिनिधी/बेळगाव
एका युवकाचा खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह रेल्वेरुळावर टाकून देण्यात आला आहे. सोमवारी सकाळी सुलधाळ रेल्वेस्थानकाजवळ ही घटना उघडकीस आली असून हा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नाही.
दुर्गाप्पा भीमराय बिचगत्ती (वय 30, रा. बुदिहाळ, ता. गोकाक) असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत अंकलगी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रेल्वेरुळावर टाकून दिल्याने मृतदेहाचे तुकडे झाले आहेत.
सोमवारी सकाळी सुलधाळजवळ रेल्वेरुळावर अनोळखीचा मृतदेह आढळला. रेल्वे विभागाने बेळगाव रेल्वे पोलिसांना यासंबंधीची माहिती दिली. रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. सायंकाळी त्याची ओळख पटली.
कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर खुनाचा संशय व्यक्त केला. तोपर्यंत अंकलगी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करायचा की अंकलगी पोलीस स्थानकात? यासंबंधी चर्चा सुरू झाली. अखेर अंकलगी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याचा निर्णय झाला. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. उपलब्ध माहितीनुसार दुर्गाप्पा हा रविवारी रात्री आपल्या घरात जेवण करत होता. त्यावेळी त्याला एक फोन कॉल आला. जेवण अर्ध्यावर सोडून तो घराबाहेर पडला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळला. दुर्गाप्पाला कोणी कॉल केला? त्याला कशासाठी बोलाविण्यात आले? जेवण अर्ध्यावर सोडून घराबाहेर पडण्याची घाई का होती? आदी प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. यासंबंधी जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्याशी संपर्क साधला असता तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.