शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर, आरोपींचा शोध सुरू
प्रतिनिधी/ बेळगाव
क्षुल्लक कारणावरून एका युवकाचा खून करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री रयत गल्ली, वडगाव परिसरात ही घटना घडली असून शहापूर पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
विनायक शिवाजी निच्चल (वय 38, रा. तिसरा क्रॉस, भारतनगर, शहापूर) असे खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. विनायकच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलीस स्थानकात भा.दं.वि. 143, 147, 302, 323, 504 सहकलम 149 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती समजताच मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी, शहापूरचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रयत गल्ली येथील लखन बिर्जे, किसन होसूरकर, सोनू व इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार गणेशोत्सवात झालेल्या भांडणाचे पर्यवसान शुक्रवारी रात्री मारहाणीत झाले आहे. विनायक हा जेवणानंतर रयत गल्ली, बोळ परिसरात लघुशंकेला गेला होता. यावेळी विनायकबरोबर भांडण काढून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर तो घरी पोहोचला.
शनिवारी सकाळी छातीत दुखू लागल्याने त्याला खासगी इस्पितळात हलविताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर शहापूर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून विनायकचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. संशयितांना अटक झाल्यानंतरच या प्रकरणी आणखी माहिती बाहेर पडणार आहे.