पुणे / वार्ताहर :
तडीपार गुंडावर कोयत्याने वार करुन त्याचा निघृण खून करण्यात आल्याची घटना पुण्याच्या कोंढवा परिसरात मंगळवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन हल्लेखोरांविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केला.
सुमित उर्फ मोन्या काकासाहेब जाधव असे खून झालेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न, दुखापत, गंभीर दुखापत, लोकांना दमदाटी करणे, लुटमार करणे अशा प्रकारचे 8 गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्या प्रतिबंधक कारवाई केल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरुच राहिल्याने त्याला तडीपार करुन अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथे सोडण्यात आले होते. तडीपार असला तरी तो पुण्यातच वास्तव्य करुन राहत असल्याचे स्पष्ट झाले.
अधिक वाचा : मलिकांच्या अडचणी वाढणार; ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित शिवनेरीनगर भागात राहायला होता. त्याच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. सुमित जाधव याला गेल्या वषी डिसेंबर 2021 मध्ये पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी 2 वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. दरम्यान, मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास सुमित कोंढवा परिसरात अशोका म्यूज सोसायटी परिसरातून दुचाकीवरून निघाला होता. त्यावेळी तीन हल्लेखोरांनी त्याला आडवून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केले. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी सुमितला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.
22 गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड जेरबंद
मोक्का, खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी या सारखे 22 गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात आरोपी लखन ऊर्फ पोपट महेश भोसले (रा. वडगाव, ता. खटाव, सातारा) याला बारामती परिसरातील घाडगेवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली.