ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची अज्ञातांनी भरदुपारी हत्या केली. तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयासमोर गजबलेल्या परिसरात पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली.
आवारे हे काही कामानिमित्त तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत आले होते. मुख्याधिकाऱयांना भेटून ते इमारतीच्या खाली आले असता दबा धरून बसलेल्या चार अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी दोघांनी कोयत्याने वार केले तर दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत आवारे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे तळेगाव दाभाडे परिसरात खळबळ उडाली असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राजकीय वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कोरोना साथरोग, कोल्हापूर आणि चिपळूण पूर आदी आपत्कालीन परिस्थितीत आवारे यांनी स्वखर्चातून भरीव मदतकार्य केले होते.