चिखलीत शासकीय समारंभात मंत्री माविन गुदिन्हो यांनी घेतला समाचार
प्रतिनिधी /वास्को
टॅक्सी व्यवसायीकांनी जुन्या मानसिकतेतून मुक्त व्हावे. गोव्याला लज्जास्पद ठरावे असे वागू नये असे आवाहन वाहतुकमंत्री माविन गुदिन्हे यांनी गोव्यातील टॅक्सी व्यवसायीकांना गोवा मुक्तीदिनानिमित्त वास्कोत केले. आता काळ बदलेला आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सज्ज व्हा. पर्यटकांवर दबाव टाकण्याचा हक्क टॅक्सीवाल्यांना नाही असे सांगून मंत्री गुदिन्हो यांनी मुरगाव बंदरात घडलेल्या विदेशी पर्यटकांचा अपमान करण्याच्या टॅक्सीवाल्यांच्या मुजोरीचा समाचारही घेतला. त्या घटनेचे तीव्र पडसाद या समारंभात उमटले.
चिखलीतील पंचायत मैदानावर गोवा मुक्ती दिनाचा शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वास्कोचे आमदार दाजी साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मुरगावचे नगराध्यक्ष लियो रॉड्रिक्स, उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर, चिखलीचे सरपंच कमला प्रसाद यादव, मुरगावच्या नगरसेविका श्रध्दा आमोणकर, स्थानिक शासकीय अधिकारी तसेच पंच सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. परीसरातील विविध शाळांनी या समारंभात सहभाग घेतला होता. यावेळी शालेय पथकांनी विविध सांस्कृतीक व पारंपरीक नृत्ये सादर केली.
या मुक्ती दिन समारंभात मुरगाव बंदरातील क्रूझ टर्मिनलच्या ठिकाणी विदेशी पर्यटकांच्याबाबत घडलेल्या प्रकरणाचे पडसाद उमटले. वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनी यावेळी बोलताना त्या घटनेचा खरपूस समाचार घेतला. गोव्यातील टॅक्सीवाल्यांच्या वर्तणुकीचे त्यांनी वाभाडेच काढले. ते म्हणाले की, मुरगाव बंदरातील धक्वयावर टॅक्सीवाल्यांनी विदेशी पर्यटकांच्याबाबतीत केलेली कृती गोव्याला लज्जास्पद ठरलेली आहे. मी सर्वच टॅक्सीवाल्यांना दोष देत नाही. मात्र, गोव्यात टॅक्सीवाल्यांनी अरेरावी चालवलेली आहे. आपल्या भागात आपलीच मक्तेदारी चालावी असे त्यांना वाटत आहे. हे टॅक्सीवाले कुठल्या जगात वावरत आहेत कुणाच ठावूक. आता जग बदललेले आहे. स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेच्या युगापासून ते वेगळे राहूच शकत नाहीत. मात्र, आपल्या टॅक्सीवाल्यांना कमी कष्टात घरी आराम करायचा आहे. त्यांनी सुशेगादपणा सोडून द्यायला हवा. स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांनी जुन्या मानसिकेतून बाहेर पडायला हवे. प्रवासासाठी आपण कुठल्या माध्यमाचा वापर करावा हे ठरवण्याचा अधिकार पर्यटकांचा आहे. टॅक्सीवाले त्यांच्यावर दबाव आणू शकत नाहीत. टॅक्सी व्यवसायीक हे पर्यटन व्यवसायाचे दूत आहेत. त्यांना ही समज असायला हवी. जुन्या मानसिकतेतून मुक्त व्हा असा संदेश आपल्याला गोवा मुक्तीदिनी त्यांना द्यावा लागत आहे. पर्यटकांना अपमानीत करण्याचा प्रकार टॅक्सीवाल्यांकडून गैरसमजाने घडला हे स्पष्टीकरण मी मान्य करणार नाही. राजकीय दबाव वापरून कारवाई रोखण्याचा प्रयत्न टॅक्सीवाल्यांकडून झालेला आहे. मात्र, असले प्रकार सहन केले जाणार नाहीत असे मंत्री गुदिन्हो यांनी बजावले. गोवा सांभाळण्यासाठी आम्हाला कडक पावले उचलावीच लागतील. मुरगाव बंदरात पर्यटकांच्याबाबतीत जे प्रकरण घडले ते शेवटचेच ठरावे अशी आशा मंत्री गुदिन्हो यांनी व्यक्त केली. गोव्यात काही लोकांकडून नकारात्मकता पसरवीण्यात येत असून हे नको ते नको असाच प्रकार काही लोकांकडून घडवला जात आहे. प्रत्येक गोष्टीला नाहक विरोध केला जात आहे. हे लोक थोडे असले तरी या वृत्तीचा त्रास मात्र सर्वांनाच होत असल्याचे मंत्री गुदिन्हो म्हणाले.