ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अंधेरी पूर्वमधील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे काही महिन्यापूर्वी दुबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेतील बंडानंतरची ही पहिलीच निवडणूक असून, ठाकरे आणि शिंदे गटाला लढण्यासाठी हे पहिलंच मैदान आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष्य या निवडणुकीकडे लागलं आहे. दरम्यान, भाजप-महायुतीने या जागेसाठी मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली असून, ते उद्या सकाळी 9 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप-महायुती अशी ही लढत होणार आहे. म्हणजेच दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके विरुद्ध मुरजी पटेल असा हा सामना रंगणार आहे. पण सध्या ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीसमोर एक प्रशासकीय अडचण आहे. लटके या मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरी पूर्व कार्यालयात कार्यरत होत्या. त्यांनी महिन्याभरापूर्वी राजीनामा दिला आहे. पण त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. जोपर्यंत त्यांचा राजीनामा मंजूर होत नाही. तोपर्यंत त्यांना निवडणुकीचा अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे ठाकरे गटापुढे पेच निर्माण झाला आहे.
अधिक वाचा : समता पार्टीकडून ‘मशाल’ चिन्हावर दावा, ठाकरे गटाची कोंडी होणार?
दरम्यान, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हा पक्ष ‘मशाल’ घेऊन या पोटनिवडणुकीत उतरणार आहे. तर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला या निवडणुकीसाठी ढाल तलवार चिन्ह मिळालं आहे. या पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचा कोणता गट आपलं अस्तित्व सिद्ध करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.