हत्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी
वृत्तसंस्था/ चंदीगढ
पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वी गोळ्य़ा घालून हत्या करण्यात आलेले गायक सिद्धू मूसेवाला यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी केली आहे. मूसेवाला यांचे वडील बालकौर सिंग यांनी अमित शहा यांना परिस्थितीची कल्पना दिली. आपल्या पुत्राचे संरक्षण जे पोलीस करू शकले नाहीत, त्यांच्याकडे या प्रकरणाचा तपास असू नये, असे स्पष्ट मत त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलताना व्यक्त केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी सकाळी चंदीगढ येथे आले असून त्यांनी पंजाबच्या भाजप नेत्यांबरोबर चर्चा केली. पंजाब पोलिसांनी त्वरित गुन्हेगारांना शोधून या प्रकरणी मूसेवाला यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही अमित शहा यांनी केली. त्यानंतर शहा हरियाणातील पंचकुला येथे रवाना झाले. पंजाब भाजप शाखेने हे प्रकरण धसाला लावण्याचा निर्धार केला आहे.
भावना आवरणे झाले कठीण
मूसेवाला यांचे पिता बालकौर सिंग यांना अमित शहांची भेट घेत असताना भावना आवरणे कठीण झाल्याचे दिसत होते. आपल्या हत्या झालेल्या पुत्राच्या आठवणीने ते अक्षरशः रडत अमित शहांना माहिती देत होते, असे नंतर तेथे उपस्थित असलेल्यांनी सांगितले. शुक्रवारी बालकौर सिंग यांनी अमित शहांना सर्व घटनाक्रम विशद केलेले पत्रही पाठविले होते, अशी माहिती देण्यात आली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी मूसेवाला यांच्या घरी जाऊन नातेवाईकांचे सांत्वन केले. मूसेवाला यांच्या शरीरावर गोळीबाराच्या 19 खुणा दिसून आल्या आहेत.