पावसामुळे दुसरा वनडे सामना रद्द
वृत्तसंस्था/ सिल्हेट
आयर्लंडचा संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील सोमवारचा दुसरा सामना पावसामुळे पंचांनी रद्द केला. या सामन्यात बांगलादेशचा फलंदाज मुशफिकुर रहीमने 60 चेंडूत नाबाद शतक झळकावून बांगलादेशच्या शकीब अल हसनचा 14 वर्षांचा विक्रम मोडीत काढला. या मालिकेत बांगलादेशने पहिला सामना जिंकून आयर्लंडवर 1-0 अशी आघाडी यापूर्वीच मिळवली आहे.
सोमवारच्या दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकात 6 बाद 349 धावा जमवल्या. बांगलादेशच्या डावात मुशफिकुर रहीमने वनडे क्रिकेट प्रकारात बांगलादेशतर्फे सर्वात जलद शतक नोंदवण्याचा पराक्रम केला. तसेच त्याने वनडे क्रिकेटमध्ये 7000 धावांचा टप्पाही ओलांडला.
या सामन्यात मुशफिकुर रहीमने 60 चेंडूत 2 षटकार आणि 14 चौकारासह नाबाद 100 धावा झळकवल्या. कर्णधार तमीम इक्बालने 31 चेंडूत 4 चौकारासह 23, लिटॉन दासने 71 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारासह 70, नजमुल हुसेनने 77 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 73, शकीब अल हसनने 2 चौकारासह 17, ऱ्हदॉयने 34 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 49 धावा झळकवल्या. बांगलादेशच्या डावात 8 षटकार आणि 31 चौकार नोंदवले गेले. आयर्लंडतर्फे ह्युमने 58 धावात 3 तर अॅडेर आणि कॅम्फर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
वनडे क्रिकेट प्रकारात बांगलादेशची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी बांगलादेशने सध्या सुरू असलेल्या आयर्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात 338 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली होती. बांगलादेशतर्फे वनडे क्रिकेटमध्ये 7000 धावांचा टप्पा ओलांडणारा यष्टीरक्षक आणि फलंदाज मुशफिकुर रहिम हा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी बांगलादेशच्या तमीम इक्बाल आणि शकीब अल हसन यांनी असा पराक्रम केला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने आयर्लंडचा 183 धावांनी दणदणीत पराभव केला होता.
संक्षिप्त धावफलक बांगलादेश 50 षटकात 6 बाद 349 (मुशफिकुर रहिम नाबाद 100, तमीम इक्बाल 23, लिटॉन दास 70, नजमुल हुसेन 73, शकीब अल हसन 17, ऱ्हदॉय 49, यासीर अली 7, तस्कीन अहमद नाबाद 1, ह्युम 3-58, अॅडेर 1-60, कॅम्फर 1-73).