कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांचे उद्गार
वार्ताहर /माशेल
संगीत ही माणसाच्या अंर्तमनाचा ठाव घेणारी व चराचरात व्यापून राहिलेली कला आहे. संगीतामुळे जीवनात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होत असतो. या कलाक्षेत्राचा अधिकाधिक प्रचार होण्यासाठी गावोगावी संगीत संमेलने होणे गरजेचे आहे, असे उद्गार कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी काढले. सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 1 व सम्राट क्लब माशेल यांच्या संयुक्त विद्यमाने खांडोळी येथील बिग बी सभागृहात आयोजित केलेल्या सम्राट संगीत महोत्सवाच्या उद्घाटन सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कुंभाजुवेचे आमादार राजेश फळदेसाई, सम्राट क्लबचे दीपक तिळवे, ऍड. उपेंद्र तिंबले, दीपक नार्वेकर, अविनाश बोरकर, प्रवीण सबसनी, गौतम खरंगटे, सम्राट माशेलचे अध्यक्ष सर्वेश फुलारी व संमोलनाच्या संयोजिका प्रचला आमोणकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. माशेल ही कलाकारांची भूमी आहे. या भागात अनेक मोठे कलाकार घडले. कलेचा हा वासरा नवीन पिढीच्या कलाकारांनी जपला पाहिजे, असे सांगून सम्राट क्लबसारख्या संस्थांचे संगीत क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय असल्याचे मंत्री गोविंद गावडे पुढे म्हणाले. आमदार राजेश फळदेसाई म्हणाले, माशेल गावात संगीत कार्यक्रमांना तुटवडा नाही. संगीताबरोबरच इतर कलाही जोपासणारे प्रतिभावंत कलाकार या भागाला लाभले असून कलेची ही परंपरा अखंडपणे जपण्याचे आवाहन त्यांनी केले. ऍड. उपेंद्र तिंबले व ऍड. दीपक तिळवी यांची यावेळी भाषणे झाली. सर्वेश फुलारी यांना यावेळी गगन भरारी पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. सर्वेश फुलारी यांनी स्वागत केले. काजल चोडणकर यांनी सूत्रसंचालन तर प्रवीण सबनीस यांनी आभार मानले.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात प्रमिलाताई वारंग यांचे शास्त्रीय गायन, साईश नाईक दलाल यांचे तबला एकलवादन व नितीन ढवळीकर यांचे गायन झाले. दुपारच्या सत्रात गोपिनाथ गावस यांचे संवादिनीवादन, सुभाष परवार यांचे गायन, सोनिक वेलिंगकर यांचे बासरीवादन व डॉ. प्रदीप सरमुकादम यांची गायनाची मैफल झाली. कलाकारांना तबल्यावर तुळशीदास नावेलकर, मिलिंद परब, संवादिनीवर दत्तराज म्हाळशी, दत्तराज सुर्लकर यांनी साथसंगत केली. शेवटच्या सत्रात अर्पिता शिरोडकर यांनी कथ्थक नृत्य सादर केले.