Tarun Bharat

संगीत हा माझ्या जीवनाचा श्वास!

Advertisements

कुमार गंधर्व संगीत संमेलनासाठी आलेल्या महेश काळे यांची भावना : तरुण भारत दिली मुलाखत

मनीषा सुभेदार /बेळगाव

गाणे त्यांनीच करावे ज्यांना गाण्याशिवाय जगणे अशक्मय आहे. गाणे हे काही शिक्षण नव्हे, ती साधना आहे. शिष्यांनी आपली पात्रता इतकी वाढवायला हवी की गुरुच्या दृष्टिक्षेपात ते येतील. मी स्वतः संगीताशिवाय, गाण्याशिवाय जगू शकत नाही. गाणे हा माझ्या जीवनाचा श्वास आहे. ‘वे ऑफ लाईफ आहे’ अशा भावना आजचे लोकप्रिय गायक महेश काळे यांनी व्यक्त केल्या.

सरस्वती वाचनालयाच्या कुमार गंधर्व संगीत संमेलनासाठी बेळगाव दौऱयावर आल्यावेळी ‘तरुण भारत’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या भावना व्यक्त केल्या. शिक्षण आणि साधना यातील फरक भारतीय आणि पाश्चात्यांची संगीताकडे पाहण्याची मानसिकता, गुरु-शिष्य परंपरा अशा विविध मुद्दय़ांवर त्यांनी भाष्य केले.

मैफलीतून प्रेरणा

ते म्हणाले, अभिजात संगीताचा ठेवा जतन करणे आणि त्याचा प्रसार करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. त्याची प्रेरणा मैफलीतून येते. शास्त्राrय संगीत दर्शनी स्वरुपामध्ये समजून घेतले तरी त्याचे अप्रुप किती आहे, याची जाणीव होण्यासाठी संगीताच्या कार्यशाळा उपयुक्त ठरतात आणि अशा कार्यशाळा मी घेतो. ज्या संगीताने आपल्या काळजाला हात घातला आहे त्या संगीताच्या काळजाला आपण हात घालू शकतो का? याचा विचार संगीत शिकणाऱया विद्यार्थ्यांनी करायला हवा.

‘रिऍलिटी शो’चा अनुभव कसा होता, त्यातून खरेच संगीत वृद्धिंगत होते का? या प्रश्नावर ते म्हणाले, रिऍलिटी शोमुळे दुर्गम भागातील अनेकांना क्यासपीठ मिळाले ही त्याची जमेची बाजू आहे. हे व्यासपीठ ‘मैलाचा दगड’ म्हणून आपण पहायला हवे. मात्र फक्त हे व्यासपीठ म्हणजेच आपले ध्येय असे शिष्यांनी समजू नये.

टिकणार फक्त गाणे….

अशा ‘शो’ नंतर अनेक मुले किंवा त्यांचे पालक स्वतःला विशेष समजतात. हवेत तरंगू लागतात. याकडे लक्ष वेधता हवेत जाणे किंवा पाय जमिनीवर ठेवून राहणे, हे आपण ठरवायला हवे. या ‘शो’मधून स्पर्धकांना अनेक प्रमाणपत्रे, स्मृतिचिन्हे किंवा अन्य काही मिळेल. परंतु हे सर्व भिंतीवर राहणार आहे. खऱया अर्थाने जे राहणार आहे ते तुमच्या गळय़ातील गाणे आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे संगीताच्या प्रवासामध्ये एक महत्त्वाचा थांबा, अशा दृष्टिने त्याकडे पहायला हवे.

संगीताचे तेज भारतामध्ये

आपण परदेशातही संगीताचे शिक्षण देता. भारत आणि पाश्चात्य देशातील शिष्यांबद्दल काय सांगाल? या प्रश्नांवर जेथे अल्पसंख्य असतात तेथे त्यांना आपल्या व संस्कृतीच्या अस्तित्वासाठी सतत स्वतःला सिद्ध करावे लागते. तेथे संगीताची ओढ विलक्षण आहे. संगीताचे तेज भारतामध्ये आहे. त्यांच्याकडे संगीताचा पाया नसला तरी त्यांना त्याचे मोल अधिक आहे. हे माझ्या दृष्टिने महत्त्वाचे आहे, असेही महेश काळे म्हणाले. गाण्याकडे परदेशातील विद्यार्थी शरण भावनेने, उपासणेच्या दृष्टिने पाहतात, अशी टिप्पणी त्यांनी जोडली.

‘गाणे त्यांनीच करावे ज्यांना गाण्याशिवाय जगणे अशक्मय आहे’

माझी आई शास्त्राrय गायिका होती. तिच्यामुळे मी गाणे शिकलो. परंतु त्यात करिअर करण्याचे निश्चित नव्हते. पण मी जसा अभिषेकी बुवांच्या सहवासात आलो तसा मी गायनाकडे आकृष्ट झालो. गायन ही माझ्यासाठी फक्त कला किंवा करिअर नाही तर तो माझ्या जगण्याचाच भाग आहे. आज अनेक वाद्ये लुप्त होत आहेत. मी बुवांचा शिष्य आहे. त्यामुळे संगीताची परंपरा मला पुढे न्यायची आहे. बुवांकडे संगीताची तालीम घेतल्यानंतर नोकरी करणे हा त्यांनी शिकविलेल्या गाण्याचा अपमान ठरला असता. म्हणून मी गाण्याकडे वळलो. असे सांगून ‘गाणे त्यांनीच करावे ज्यांना गाण्याशिवाय जगणे अशक्मय आहे’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गुरुने शिष्य निवडावा….

अनेक माध्यमे उपलब्ध असल्याने संगीत शिकणाऱया विद्यार्थ्यांना गुरु निवडणे कठीण जाते. त्यांच्यासाठी काय सांगाल? या प्रश्नावर येथे शिष्यांची निवड महत्त्वाची नाही तर गुरुने शिष्य निवडणे महत्त्वाचे आहे. संस्कार व शिक्षण यामध्ये फरक आहे. संस्कार हा संस्कृतीचा गाभा आहे. त्यामुळे संगीताचे संस्कार होणे आवश्यक आहे. मी स्वतः तीन ते चार टप्प्यावर विद्यार्थ्यांची निवड करतो. माझ्या मते शिष्यांनी आपली पात्रता इतकी वाढवायला हवी, तो गुरुच्या दृष्टिक्षेपात येवू शकेल. गुरुला किंवा शिक्षकांना जी फी देता ते तुम्हाला उपलब्ध असल्याची फी आहे. तुम्ही कलेची फी देऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

श्रोत्यांबाबत बोलताना ते म्हणाले, तुम्हाला गाण्याशी तादात्म्य पावता येते का? हे तुम्ही तपासून पहा. वाहन चालविताना ऐकले जाणारे संगीत हे पार्श्वसंगीत असते. परंतु मनाला आनंद देणारे (माईंड फूल लिसनिंग) संगीत ऐकायचे असेल तर प्रथम आपल्याला काय आवडते? याची माहिती करून घ्या. त्यानंतर त्या संगीताशी तुमची नाळ जुळते का? हे पहा. हळूहळू तुम्हाला संगीताचा आनंद घेता येईल.

या मुलाखती दरम्यान त्यांनी अमराठी लोकांना भारतीय संगीताची महती सांगण्यासाठी आपण हिंदी, किंवा उर्दूमध्येसुद्धा गीते सादर करत आहोत, असे सांगून ‘ये जमीं भी तेरी, ये आसमा भी तेरा, मेरा क्मया है भला, विठ्ठला’ या गीताचा दाखला दिला.

Related Stories

फल-पुष्प प्रदर्शनाला उत्साहात प्रारंभ

Amit Kulkarni

बनावट फॉर्म क्रमांक 2 प्रकरणी कारवाई करणार

Omkar B

घरपोच मिळतोय हयातीचा दाखला

Amit Kulkarni

चांदर येथे तरूणीला भर दिवसा दोन युवकांनी ‘डेटॉल’ पाजले

Patil_p

पणजी शिमगोत्सव समितीतर्फे सत्कारसोहळा

Amit Kulkarni

फोंडा बाजारातील पायवाट बंद केल्याने व्यापारी संतप्त

Amit Kulkarni
error: Content is protected !!