Tarun Bharat

कौशल्य शिक्षणात पारंगत होणे आवश्यक

Advertisements

राजर्षि शाहू महाराज जयंतीनिमित्त प्रा. भुकेले यांचे ‘भविष्यावर बोलू काही’ विषयावर व्याख्यान : सार्वजनिक वाचनालयातर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार

प्रतिनिधी /बेळगाव

स्वातंत्र्यापूर्वी सर्वांना प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी राजर्षि शाहू महाराजांनी  प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली. स्वातंत्र्यानंतर उच्च शिक्षणासाठी महत्त्व दिले जात आहे. पण उच्च शिक्षण घेतल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे योग्य त्या क्षेत्राची निवड करून कौशल्य शिक्षणात विद्यार्थ्यांनी पारंगत होणे आवश्यक असल्याचे मनोगत प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी व्यक्त केले.

सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने राजर्षि शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि प्रा. शिवाजीराव भुकेले यांचे ‘भविष्यावर बोलू काही’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिवाजीराव भुकेले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे. शेतकरी आणि दलित समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शाहू महाराजांनी मोफत शिक्षण देण्याची योजना आखून आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली. त्यांचा दूरदृष्टिकोन पाहता प्रत्येक क्षेत्रातील आणि समाजातील नागरिकांच्या मुलांनी शिक्षण घ्यावे असा होता.

दलितांचे कैवारी शाहू महाराज

रयतेचा आणि दलितांचा कैवारी म्हणून शाहू महाराजांचा नावलौकिक आहे. स्वातंत्र्यापूर्वी प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून हे शिक्षण देण्याचे कार्य सुरू करण्यात आले होते. पण स्वातंत्र्यानंतर केवळ उच्च शिक्षणासाठी मोठय़ा प्रमाणात महत्त्व दिले जात आहे. आज शिक्षणासाठी साडेतीन टक्के निधी खर्च केला जातो. पण यापैकी अडीच टक्के उच्च शिक्षणासाठी आणि केवळ 1 टक्का प्राथमिक शिक्षणासाठी खर्च करण्यात येत आहे. पण उच्च शिक्षणानंतर काय? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

प्रत्येकजण सायन्स किंवा पदवी शिक्षणाकडे वळत आहेत. मात्र, हे शिक्षण घेतल्यानंतर पुढे नोकरी मिळेल का? याची शाश्वती नाही. राजर्षि शाहू महाराजांनी कौशल्य शिक्षणालाही महत्त्व दिले होते. कौशल्य शिक्षणाची आजच्या काळात गरज आहे, असे मनोगत प्रा. भुकेले यांनी व्यक्त केले.

सार्वजनिक वाचनालयाला 174 वर्षांची परंपरा

सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. सार्वजनिक वाचनालयवतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. व्याख्यानमाला, संगीत भजन, शैक्षणिक उपक्रम आणि विविध क्षेत्रात यश घेणाऱया विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. दहावी परीक्षेत सर्वाधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केल्याचे सांगून 174 वर्षांची परंपरा सार्वजनिक वाचनालयाला असल्याची माहिती नेताजी जाधव यांनी प्रास्ताविकात दिली.

याप्रसंगी प्रा. शिवाजी भुकेले यांच्या हस्ते राजर्षि शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्ष नेताजी जाधव यांच्या हस्ते प्रा. शिवाजीराव भुकेले यांचे स्वागत करण्यात आले. तसेच दहावी परीक्षेत चांगले गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि पारितोषिक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

याप्रसंगी सार्वजनिक वाचनालयाचे मानद कार्यवाह लता पाटील, वाचनालयाचे सल्लागार माजी महापौर गोविंद राऊत, गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, डॉ. सुरेश पाटील आदींसह वाचनालयाचे पदाधिकारी व विद्यार्थी-पालक उपस्थित होते.

Related Stories

खासबाग येथे खुल्या जागेत अतिक्रमण

Omkar B

धास्ती कोरोनाची….झाली राख दागिन्यांची

Patil_p

बेळगाव शहर आता ‘ग्रीन’ श्रेणीत

Omkar B

माध्यमिक विभागाची सहामाही परीक्षा उद्यापासून

Amit Kulkarni

कौन्सिल सेक्रेटरींसह मनपातील आठ कर्मचारी सेवानिवृत्त

Amit Kulkarni

चौथे रेल्वेगेट येथे अडकताहेत वाहने

Amit Kulkarni
error: Content is protected !!