वार्ताहर / सांबरा
मुतगा येथील जागृत देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ग्रामदेवता श्री भावकेश्वरी देवी च्या यात्रेला शुक्रवार दि. 22 रोजी उत्साहात प्रारंभ झाला. दरम्यान दिवसभरात परिसरातील हजारो भाविकांनी श्रीदेवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. त्यामुळे मंदिर परिसर व गावातील मुख्य रस्ता भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
गावात सालाबादप्रमाणे श्री भावकेश्वरी देवीची यात्रा होत असते मात्र मागील दोन वर्षे कोरोनामुळे यात्रा होऊ शकली नव्हती. यंदा यात्रा मोठय़ाने होत असून ग्रामस्थांत उत्साहाचे वातावरण आहे. यात्रेनिमित्त गावामध्ये पाळणे व खेळण्यांची दुकाने दाखल झाली आहेत. यात्रेला दरवषी परिसरातील व परगावचे हजारो भाविक हजेरी लावत असतात. दिवसभरात हजारो भाविक देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन देवस्थान कमिटी, ग्राम सुधारणा मंडळ व ग्रामपंचायतीने यात्रेची जय्यत तयारी केली होती. तर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
पार्किंगमध्येच वाहने लावण्याचे भाविकांना आवाहन
भाविकांना देवीचे दर्शन व्यवस्थित घेता यावे, यासाठी महिला व पुरुष अशा दोन रांगांची सोय करण्यात आली होती. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाली होती. सायंकाळनंतर तर भाविकांच्या गर्दीला उधाण आले होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मारिहाळ पोलिसांनीही बरेच परिश्रम घेतले. यात्रेला येणाऱया भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहनांच्या पार्किंगची सोय मेन रोड वरील न्यू इंग्लिश स्कूलचे मैदान व मराठी प्राथमिक शाळेचे मैदान अशा दोन ठिकाणी करण्यात आली होती. शनिवारी यात्रेला येणाऱया भाविकांनी पार्किंगमध्ये आपली वाहने थांबवून यावे असे आवाहन करण्यात आले आहे
शुक्रवारी पहाटे मूर्तीला अभिषेक घालून उत्सव मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मूर्तीची दागदागिने घालून सजावट करण्यात आली. प्रारंभी हक्कदार घराण्यांकडून सवाद्य येऊन देवीची ओटी भरण्यात आली. त्यानंतर दिवसभरात ओटी भरणे, नवस फेडणे आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. रात्री बारानंतर देवीला गाऱहाणे घालण्याचा कार्यक्रम झाला.
28 रोजी गावामध्ये कटबंद वार
शनिवारी दिवसभर प्रत्येकांच्या घरी जेवणाचा बेत असल्याने भाविकांची गर्दी होणार आहे. गुरुवार दि. 28 रोजी गावामध्ये कटबंद वार पाळण्यात येणार आहे. हा वार दर तीन वर्षांतून एकदा गावात पाळला जातो.