प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावच्या महिला वेगवेगळय़ा करिअर निवड करून त्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत. बेळगावच्याच सुकन्या असलेल्या आणि पेशाने कॅप्टन असणार्या रक्षा थंडसरी यांनी आपला मुलगा आरव याच्यासमवेत माऊंट किलीमंजारो हे शिखर सर केले आहे. हे शिखर म्हणजे आफ्रिकाचे छत समजले जाते व ते तसे सर करणेसुद्धा कठीण आहे.
माऊंट किलीमंजारो हे आफ्रिकेतील सर्वाधिक उंचीचे शिखर असून त्याची उंची 5 हजार 895 मीटर आहे. हे जगातील सातव्या क्रमांकाच्या उंचीचे शिखर मानले जाते. लहानपणापासूनच साहसाची आवड असलेल्या रक्षा यांनी 15 ऑक्टोबर रोजी हे कठीण असे शिखर सर करून बेळगावचे नाव उंचावले आहे. यापूर्वी त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प हि गिर्यारोहण मोहिमही पूर्ण केली आहे.
त्यांचा जन्म बेळगावचा असून आरएलएसमधून त्यांनी पदवी घेतली. सध्या त्या मुंबईमध्ये असून बोईंग-777 च्या त्या सिनियर कॅप्टन आहेत. शिखर सर करण्याची आवड, कौटुंबिक जबाबदारी आणि नोकरी यामुळे काही काळ बाजूला ठेवावी लागली. परंतु, आता या बूट्स अँड क्रॅम्पॉन्स या साहसी खेळाच्या कंपनीचे सहसंस्थापक लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) रोमिल बार्थवाल यांच्या मार्गदर्शनाखाली 13 वर्षीय मुलगा आरव याच्यासह रक्षा यांनी हे शिखर सर केले. माऊंट किलीमंजारो शिखर सर करणारे हे सर्वाधिक कमी वयाचे माता आणि पुत्र आहेत. या यशाबद्दल रक्षा यांचे विशेष अभिनंदन होत आहे.