प्रतिनिधी/ बेंगळूर
मागील दोन वर्षे कोरोनामुळे ऐतिहासिक म्हैसूर दसरोत्सव साधेपणाने पार पडला होता. राज्य सरकारने यंदा अत्यंत थाटात दसरा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता तयारीही सुरू झाली असून कोणाच्या हस्ते उद्घाटन होणार या प्रश्नावर आता पडदा पडला आहे. राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या हस्ते दसरोत्सवाचे उद्घाटन होणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले आहे.
म्हैसूर दसरोत्सवाच्या उद्घाटनासाठी कोणाला निमंत्रण द्यावे, यासंबंधी चर्चा करण्यात आली होती. अंतिमतः दौपदी मुमू यांना निमंत्रण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 26 सप्टेंबर रोजी दसरोत्सव सुरू होणार आहे. पूर्वतयारी बैठकीनंतर राष्ट्रपतींना पत्र पाठविण्यात आले होते. आपल्या पत्राला त्यांनी प्रत्युत्तर पाठवून उद्घाटनाला येण्यास संमती दर्शविली आहे, असेही बोम्माई यांनी सांगितले.