वृत्तसंस्था/ माद्रीद (स्पेन)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या माद्रीद मास्टर्स 1000 दर्जाच्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत माजी टॉप सीडेड राफेल नदाल आणि कार्लोस अलकॅरेझ या दोन स्पेनच्या टेनिसपटूंमध्ये उपांत्यपूर्व फेरीचा सामना होणार आहे.
21 ग्रॅण्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविणाऱया तसेच ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम विजेत्या राफेल नदालने गुरूवारच्या सामन्यात बेल्जियमच्या डेव्हिड गोफीनचा 6-3, 5-7, 7-6 (9-7) अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. 35 वर्षीय नदालच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील हा 1050 वा विजयी सामना आहे. गोफीनने नदालला या सामन्यात विजयासाठी चांगलेच झुंजविले. नदालने पहिला सेट जिंकल्यानंतर गोफीनने दुसरा सेट जिंकून सामन्यात रंगत आणली. अपेक्षेप्रमाणे तिसरा आणि शेवटचा सेट टायब्रेकरपर्यंत लांबला. नदालने आपल्या अनुभवाच्या जोरावर गोफीनचे आव्हान संपुष्टात आणले.
या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात स्पेनच्या कार्लोस अलकॅरेझने ब्रिटनच्या कॅमेरून नोरीचा 6-4, 6-7 (4-7), 6-3 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. आता नदाल आणि अलकॅरेझ यांच्यात पुढील फेरीचा सामना होईल. 2022 च्या टेनिस हंगामात अलकॅरेझने तीन स्पर्धा जिंकल्या असून त्याने मानांकनात पहिल्या 10 खेळाडूमध्ये स्थान मिळविले आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अलकॅरेझ ‘अंडरडॉग’ राहील, असे मत नदालने व्यक्त केले आहे.
या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात जर्मनीच्या विद्यमान विजेत्या ऍलेक्सझांडेर व्हेरेव्हने इटलीच्या मुसेटीचा 6-3, 1-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. दुखापतीमुळे मुसेटीने हा सामना अर्धवट सोडला. त्याचप्रमाणे रशियाच्या सहाव्या मानांकित रूबलेव्हने ब्रिटनच्या डॅन इव्हान्सचे आव्हान 7-6 (7-5), 7-5 त्याचप्रमाणे ग्रीसच्या चौथ्या मानांकित सित्सिपसने बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हचे आव्हान 6-3, 6-4 असे संपुष्टात आणत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. सर्बियाचा टॉप सीडेड जोकोविचचा पुढील सामना हुरकेझशी होणार आहे. हुरकेझने लेजोव्हिकचा 7-5, 6-3 असा पराभव केला.